Mahaganpati Temple Close : रांजणगावचे ‘महागणपती मंदिर’ १५ एप्रिलपासून दर्शनासाठी बंद! काय आहे कारण?
Mahaganpati Temple Close : दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी पुरातत्त्व विभागाचा पुढाकार; भाविकांनी सहकार्य करण्याचे देवस्थान समितीचे आवाहन.

Mahaganpati Temple Close – अष्टविनायक आराखड्यांतर्गत महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून श्रीमहागणपती मंदिराच्या जतन व दुरुस्तीचे काम पुरातत्त्व विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेले हे काम आता मुख्य मंदिर आणि परिसरात वेगाने सुरू आहे. या कामाच्या सुरक्षिततेसाठी आणि नियोजनासाठी देवस्थान समितीने १५ एप्रिल ते ३१ जुलै या कालावधीत मंदिर भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांनी यास मान्यता दिली आहे.
मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी श्रींची नित्य पूजा, अभिषेक आणि इतर सर्व धार्मिक विधी परंपरेनुसार नियमित सुरू राहणार आहेत. मात्र, या काळात भाविकांना प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध नसेल आणि मंदिर परिसरात प्रवेशावर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. केवळ अधिकृत अधिकारी, कर्मचारी, बांधकाम यंत्रणा आणि विश्वस्तांनाच या परिसरात प्रवेश दिला जाणार आहे. मंदिराच्या दीर्घकालीन सुरक्षिततेसाठी आणि भाविकांच्या सोयीसाठी ही विकासकामे अत्यंत आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
यावेळी डॉ. विलास वहाणे (सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग, पुणे), बाळासाहेब म्हस्के (तहसीलदार, शिरूर), मुख्य विश्वस्त ओमकार देव, अध्यक्ष स्वातीताई पाचुंदकर, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर, रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक महादेव वाघमोडे तसेच ग्रामस्थ व अधिकारी उपस्थित होते. मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अष्टविनायक दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी आपल्या दौऱ्याचे नियोजन करताना या बदलाची नोंद घेणे आवश्यक आहे.





