Mahadev Munde Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात मोठी अपडेट; हत्येचा उलगडा होणार?
Mahadev Munde Case : परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयितांच्या नार्को आणि ब्रेन मॅपिंगचा अहवाल प्राप्त झाला असून, तो न्यायालयात सादर केला जाणार आहे.

Mahadev Munde Case : बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणात आता एक महत्त्वाची कायदेशीर प्रगती झाली आहे. विशेष तपास पथकाच्या हाती संशयितांच्या नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगचा अहवाल आला असून, यामुळे या गुढ हत्येचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा अहवाल न्यायालयासमोर उघडला जाणार असून, त्यातील माहितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२० ऑक्टोबर २०२३ रोजी परळी तहसील कार्यालयासमोर महादेव मुंडे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही हत्या केवळ १२ गुंठे जमिनीच्या वादातून झाली असल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता.
या प्रकरणात वाल्मीक कराड आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप आहेत. कराड यांचे सहकारी बाळा बांगर यांनी एसआयटीसमोर दिलेल्या जबाबात हत्येनंतरच्या धक्कादायक प्रसंगांचे वर्णन केले असून, यात वाल्मीक कराडच्या मुलाच्या नावाचा वारंवार उल्लेख केला आहे.
आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने गेल्या सहा महिन्यांत व्यापक तपास केला आहे. या काळात सुमारे २०० लोकांची चौकशी, १५० संशयितांची तपासणी आणि ५०० हून अधिक कॉल डिटेल्सचे विश्लेषण करण्यात आले.
महादेव मुंडे हे पिग्मी एजंट असल्याने आर्थिक व्यवहार, प्लॉटिंगचे वाद किंवा वैयक्तिक वैमनस्य अशा सर्व कोनांतून तपास सुरू आहे. आता नार्को रिपोर्टमधून हत्येचा मुख्य सूत्रधार कोण, हे स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे.

