Sharad Pawar : बीड जिल्ह्यातील केज विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे केज मतदारसंघातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर संगीता ठोंबरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षाच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी पक्षाने त्यांच्यावर मोठा विश्वास दाखवत संगीता ठोंबरे यांची शिवसेनेच्या प्रभारी उपनेतेपदी नियुक्ती जाहीर केली. या प्रवेश सोहळ्यात संगीता ठोंबरे यांच्यासह माजी सरपंच किशोर थोरात, भगवान सेनेचे अध्यक्ष विजय बापू केंद्रे, अशोक सक्राते, अरविंद चाळक, उमेश चाळक यांच्यासह केज विधानसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, अनिल जगताप, अजित पिंगळे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगीता ठोंबरे यांच्या प्रवेशामुळे केज विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढल्याचे मानले जात असून, आगामी काळात या भागातील राजकारणात महत्त्वाचे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शरद पवार गटाच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंचा आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश