महादेव जानकरांची मोठी घोषणा ! ‘या’ मतदारसंघातून लढवणार पुढची लोकसभा निवडणूक

अकोला : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. पुढची म्हणजे 2029 ची लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. ते अकोला जिल्ह्यातील बाळापूर या ठिकाणी बोलत असताना त्यांनी हे जाहीर केले. जानकर यांचा नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघातून परभाव झाला होता. शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय जाधव यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
परभणी लोकसभा मतदारसंघात पराभव का झाला?
परभणी लोकसभा मतदारसंघात आपला पराभव हा मुस्लिम आणि दलित मतदार विरोधात गेल्याने झाला असल्याचे त्यांनी जाहीर केले. परभणी लोकसभा मतदार संघात महादेव जानकर हे महायुतीकडून निवडणूक लढले होते. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव हे होते. तर वंचित बहुजन आघाडीकडून हवामान अभ्यासक पंजाबराव डख हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत संजय जाधव यांनी मोठ्या मताधिक्याने महादेव जानकर यांचा पराभव केला होता.
व्यक्त केला विश्वास
जानकरांनी पुढची लोकसभा निवडणूक बारामती लोकसभा मतदारसंघातून लढवण्याचे जाहीर केले आहे. बारामतीत ताकदीने लढून विजयी होणार असल्याचा विश्वास देखील महादेव जानकर यांनी यावेळी व्यक्त केला.




