Mahadev Betting App : महादेव बेटिंग ॲप प्रकरणी सीबीआयची कारवाई मोठी कारवाई; मुख्य सूत्रधार अभिषेक कुमारला अटक
हादेव ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणातील (Mahadev Betting App) कथित मुख्य सूत्रधार अभिषेक कुमार याला सीबीआयने अटक केली आहे.

Mahadev Betting App : महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणातील (Mahadev Betting App) कथित मुख्य सूत्रधार अभिषेक कुमार याला सीबीआयने अटक केली आहे. दुबईहून हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल होताच त्याला ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली.
या कारवाईनंतर कुमारला हैदराबादमधील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या अटकेनंतर घेतलेल्या झडतीदरम्यान त्याच्याकडून आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आल्याचेही यंत्रणेने सांगितले.
जप्त केलेल्या साहित्यावरून ‘महादेव बेटिंग ॲप’च्या (Mahadev Betting App) कामकाजात त्याची सक्रिय भूमिका असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तसेच, त्याने सौरभ चंद्राकर आणि शुभम सोनी यांसारख्या इतर मुख्य आरोपींसोबत जवळून काम केले होते.
महादेव बुक अंतर्गत ऑनलाइन सट्टेबाजी आणि जुगाराचे कामकाज चालवणे, बेटिंग पॅनेल्सचा समन्वय साधणे, निधी गोळा करणे आणि सट्टेबाजी व जुगारातून मिळालेल्या पैशांचा वापर करून दुबईमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी करणे यामध्ये कुमारने सक्रिय भूमिका बजावली होती, असा आरोप तपास यंत्रणेने केला आहे.
दरम्यान, महादेव ॲपचा (Mahadev Betting App) प्रसार प्रामुख्याने छत्तीसगडमधील सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल या दोन फरार व्यावसायिकांकडून केला जात होता. २०१९ पासून यातून ८०,००० कोटी रुपयांची बेकायदेशीर कमाई झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.





