Mahadare Lake : पर्यटकांचे आकर्षण की कचऱ्याचे साम्राज्य? महादरे तलावाची दुरवस्था पाहून नागरिक संतापले
Mahadare Lake : शहराच्या सौंदर्याला गालबोट; महादरे तलाव परिसरात सर्वत्र पसरला प्लॅस्टिक कचरा आणि मद्याच्या बाटल्यांचा विळखा.

Mahadare Lake – निसर्गसौंदर्याने नटलेला आणि नागरिकांच्या सकाळ- संध्याकाळच्या फेरफटक्याचे आकर्षण असलेला महादरे तलाव परिसर सध्या कचराकुंडीत रुपांतरित झाला असून प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तलाव परिसरात मद्याच्या रिकाम्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, चिप्सचे रॅपर्स, पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि विविध प्रकारचा कचरा मोठ्या प्रमाणावर विखुरलेला दिसून येत आहे.
शहराच्या पश्चिमेस असलेला महादरे तलाव परिसर नागरिकांसाठी निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचे महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवक दररोज येथे फिरण्यासाठी येतात. मात्र, गेल्या काही दिवसांत येथे वाढलेल्या अस्वच्छतेमुळे नागरिकांना परिसरात थांबणेही कठीण झाले आहे. पूर्वी तलाव परिसरातील बाकांवर काही वेळ निवांत बसून निसर्गाचा आनंद घेता येत होता.
मात्र, आता परिसरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने उभे राहणेही नकोसे वाटत आहे. मद्यप्राशन करून बाटल्या जागेवरच फेकणे, खाद्यपदार्थांचे वेष्टन तसेच प्लास्टिकचा कचरा टाकणे हा प्रकार रोजचाच बनला आहे, असे नियमितपणे चालण्यासाठी येणाऱ्या काही नागरिकांनी सांगितले. विशेष म्हणजे, परिसरात ‘स्वच्छता राखा’ असे आवाहन करणारा फलकही दुर्लक्षित अवस्थेत पडला असल्याचे चित्र आहे.
एकीकडे स्वच्छतेचे संदेश देणारे फलक उभारले जातात, तर दुसरीकडे प्रत्यक्षात त्या परिसराची दुर्दशा होत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तलाव परिसरातील ही अस्चच्छता केवळ सौंदर्याला बाधा आणणारी नाही, तर पर्यावरण आणि जैवविविधतेलाही धोका निर्माण करणारी आहे. प्लॅस्टिक व काचेच्या बाटल्यांमुळे पक्षी व इतर प्राण्यांनाही इजा होण्याची शक्यता आहे. नगरपालिकेने तातडीने विशेष स्वच्छता मोहीम राबवावी, कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी तसेच परिसरात सीसीटीव्ही आणि नियमित गस्त व्यवस्था सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
प्रशासनासह लोकसहभाग हवा
‘निसर्गाने दिलेले सौंदर्य जपण्याऐवजी त्याची वाट लावण्याची मानसिकता समाजात वाढत आहे का?’ असा संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. महादरे तलावाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी प्रशासन आणि नागरिक या दोघांनीही जबाबदारी स्वीकारण्याची गरज निर्माण झाली आहे. निसर्गरम्य असणाऱ्या या परिसराला अधिक आकर्षक करण्याची जबाबदारी पालिकेची असली तरी परिसराचे सोंदर्य टिकविण्यासाठी आणि पर्यावरण संतुलन राखण्याची जबाबदारी नागरिकांचीही आहे. त्यामुळे पालिकेसह लोकसहभागातून जबाबदारी पेलली गेली तर हा परिसर शहरातीलच नव्हे तर इतर पर्यटकांनाही खुणावर राहणार आहे.






