Mahad Road: महड वरदविनायक मंदिराचा रस्ता ‘वन’वासात; डांबरीकरण रखडल्याने अपघातांचा धोका वाढला
Mahad Road: मागील वर्षी मिळालेली तात्पुरती परवानगी ठरली निष्फळ; कायमस्वरूपी डांबरीकरणासाठी वन विभागाच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा.

Mahad Road – वन विभागाच्या परवानगीअभावी ताकई फाट्यावरून अष्टविनायकांपैकी श्री वरदविनायक मंदिर, महडकडे जाणाऱ्या रस्त्याचे डांबरीकरण रखडले असून रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून तलावाचे स्वरूप निर्माण होत असल्याने वाहनचालक, पादचारी आणि भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
महड गावाला ताकई फाट्याशी जोडणारा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असून पेण-खोपोली मार्गाशी जोडला जातो. श्री वरदविनायक मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक, तसेच पुंडलिक मंदिरात दशक्रिया विधीसाठी येणारे नागरिक या मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. याशिवाय विद्यार्थी आणि स्थानिक ग्रामस्थांसाठीही हा रस्ता महत्त्वाचा आहे. मात्र या मार्गातील सुमारे अर्धा किलोमीटरचा भाग वन विभागाच्या हद्दीत येत असल्याने डांबरीकरणासाठी आवश्यक परवानगी मिळालेली नाही.
परिणामी अनेक वर्षांपासून वाहनचालकांना खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला असून वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना तर सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील यांनी यापूर्वी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
त्यांच्या प्रयत्नांमुळे मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून खड्डे भरण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर काही प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र पुन्हा रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या मार्गाचे कायमस्वरूपी डांबरीकरण करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाविक, ग्रामस्थ आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.





