Akurdi Road Collapse : आकुर्डीत संताप! डांबरीकरण केलं अन् एकाच दिवसात रस्ता खचला; कामाचा दर्जा काय?
Akurdi Road Collapse : आकुर्डी येथील सेंट उर्सुला शाळेजवळ नव्याने केलेल्या डांबरीकरणाचे पितळ उघडे; रस्ता खचल्याने सार्वजनिक निधीच्या अपव्ययाचा नागरिकांचा थेट आरोप.

Akurdi Road Collapse – आकुर्डी येथील सेंट उर्सुला शाळेजवळ नुकतेच करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नव्याने डांबर टाकण्यात आलेल्या रस्त्याचा काही भाग अवघ्या एका दिवसात खचल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून संबंधित विभागाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
सेंट उर्सुला शाळा परिसर हा विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या दैनंदिन वर्दळीचा भाग आहे. या रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी, पालक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. रस्त्याची अवस्था सुधारण्यासाठी नुकतेच डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र काम पूर्ण होताच रस्त्यावर खड्डे आणि खचलेले भाग दिसू लागल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
स्थानिकांच्या मते, नव्याने तयार झालेला रस्ता काही तासांतच उखडू लागणे ही गंभीर बाब आहे. यामुळे कामाची गुणवत्ता, वापरण्यात आलेले साहित्य आणि कामाच्या अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सार्वजनिक निधीतून करण्यात आलेल्या कामांचा दर्जा असा असेल तर नागरिकांच्या पैशांचा अपव्यय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
खचलेल्या भागामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वारांसाठी हा भाग धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. पाणी साचल्यास खड्ड्यांचा अंदाज येणार नाही आणि अपघात होण्याचा धोका वाढणार आहे.
नागरिकांनी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसेच रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून दर्जेदार कामाची हमी द्यावी, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. एका दिवसात खचलेल्या या रस्त्यामुळे शहरातील विकासकामांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

