Mahabhumi Stack: एकाच संकेतस्थळवर जमिनींची कागदपत्रे
Mahabhumi Stack:

जमीनविषयक दहा प्रमुख सेवा महाभूमी स्टॅक एकाच प्रणालीवर
Mahabhumi Stack: जमिनींचे खरेदी- विक्रीच्या व्यवहारात आणि व्यवहारानंतर अनेक बाबतीत नागरिकांना सातबारा उतारा, फेरफार, जमिनींचा नकाशा आदींसाठी महाभूलेख, महाभूनकाशा आदी संकेतस्थळांची मदत घ्यावी लागते. यासर्व प्रणालीचे एकत्रीकरण करून जमीनविषयक दहा प्रमुख सेवा महाभूमी स्टॅक या एकच प्रणालीवर उपलब्ध करून दिल्या आहेत.
राज्य शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत विकसित करण्यात आलेली भूमी प्रशासनासाठीची महाभूमी स्टॅक प्रणालीचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. या वेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी या प्रणालीचे सादरीकरण केले.
या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की राज्य शासनाने ईज ऑफ लिव्हिंग आणि ईज ऑफ डुइंग बिझनेस धोरण स्वीकारले आहे. महाभूमी स्टॅक प्रणाली या धोरणाच्या अनुषंगानेच आहे. महसूल विभागाने या प्रणालीचा अतिशय प्रभावीपणाने वापर करावा, त्याचबरोबर नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, यासाठी विशेष प्रयत्न करावे.
आर्थिक विकासाला चालना
राज्याच्या महसूल आणि जमीनविषयक सुधारणामधील हा अतिशय महत्वाचा टप्पा आहे. महाभूमी स्टॅक प्रणालीमुळे राज्यातील सर्व जमिनीच्या मालकी हक्काबाबत एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार असल्याने राज्यातील गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
प्रणालीची वैशिष्ट्ये
– राज्यातील साडेतीन कोटींहून अधिक सातबारे उतारे व आठ उपलब्ध
– राज्यातील दीड कोटींहून अधिक जमिनींचे नकाशे उपलब्ध
– राज्यातील ४० कोटींहून अधिक ऐतिहासिक स्कॅन केलेले फेरफार व जुने अभिलेख उपलब्ध
– नोंदणी विभागाचे इंडेक्स २
नागरिकांना होणारे फायदे
कोणत्याही जमिनीच्या खरेदी- विक्रीपूर्वी नागरिक स्वतःच मोबाइलवर पडताळणी करू शकतात, की त्या जमिनीचे सध्याचे वापरकर्ते कोण आहेत, त्यावर कोणते बोजे आहेत का, कोणत्या न्यायालयात दावे दाखल आहे का, तसेच ७/१२ उतारा, ८- अ उतारा, नकाशा, फेरफार स्थिती, मोजणी अर्ज, दस्त शोध अशा विविध सेवांसाठी वेगवेगळ्या संकेतस्थळावर आणि कार्यालयांमध्ये जाण्याची आवश्यकता राहणार नाही. आवश्यक असलेले सर्व भूमिअभिलेख घरबसल्या उपलब्ध होतील.





