Katraj Zoo : प्राणिसंग्रहालयात लवकरच नव्या प्राण्यांचे आगमन ; अफ्रिकन, अमेरिकन माकडे पाहण्याची पर्यटकांना संधी

प्रभात वृत्तसेवा
पुणे – तब्बल १३० एकर क्षेत्रात विस्तारलेले महापालिकेच्या कात्रज येथील भारतरत्न राजीव गांधी प्राणीसंग्रहालय आता नव्या प्राण्यांनी समृद्ध होणार आहे. पुढील वर्षी मार्च २०२६ अखेरपर्यंत बबून (अफ्रिकन माकड), तसेच अमेरिकन जंगलात आढळणाऱ्या चार वेगवेगळ्या प्रजातींच्या माकडांच्या जोड्या पर्यटकांना पाहता येणार आहेत, अशी माहिती प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाने दिली. याशिवाय झेब्रा आणि जिराफ आणण्याची प्रक्रिया महापालिकेकडून गतिमान करण्यात येणार आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अलीकडेच प्राणिसंग्रहालयास भेट दिली. या वेळी पर्यटकांना प्रत्येक वेळी नावीन्यपूर्ण प्राणी पाहता यावेत, यासाठी सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, तसेच प्रस्तावित विस्तार आराखडा (मास्टर प्लॅन) लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यानंतर प्रशासनाकडून या आराखड्याला गती देण्यात आली आहे.सध्या प्राणीसंग्रहालयात ५६ प्रजातींचे ४०० प्राणी आहेत. मात्र, प्रस्तावित विस्तारीत आराखड्यात १५० प्रजातींचे १ हजारांहून अधिक प्राणी ठेवण्याची योजना आहे.
या आराखड्यास २०१३ मध्ये मान्यता देण्यात आली होती. २०२३ मध्ये त्यात बदल करून आणखी प्रजाती व बर्ड पार्कचा समावेश करण्यात आला. अंमलबजावणीसाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मात्र, आवश्यक निधी गेल्या दोन वर्षांपासून उपलब्ध न झाल्याने कामे रखडली होती. दरम्यान, मुंबई महापालिकेने ५३ एकर जागेत तब्बल ४०० कोटी रुपयांत आधुनिक प्राणिसंग्रहालय उभारले आहे. त्यामुळे पुण्यातील या मास्टर प्लॅनला गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
“संग्रहालयात सिंह, वाघांची संख्या कमी आहे. प्राणी संग्रहालय मोठे आणि व्यवस्थापन उत्तम असले, तरी प्राण्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे पर्यटकांना प्रत्येक वेळी नवीन काहीतरी देण्यासाठी मास्टर प्लॅनची अंमलबजावणी केली जाईल. मात्र, सहज उपलब्ध होणाऱ्या वेगवेगळ्या प्रजातींचे प्राणी वाढविण्याच्या सूचना प्रशासनास केल्या आहेत.”
– नवल किशोर राम, महापालिका आयुक्त





