Shivendrasinhraje Bhosale – देशातील मिनी काश्मीर म्हणजेच महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून देशभरात प्रसिद्ध आहे. वर्षभर येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. विशेषतः वाई, पाचगणी, महाबळेश्वर आणि पोलादपूर या मार्गांवर पर्यटन हंगामात वाहनांची मोठी गर्दी होत असल्याने वाहतुकीवर प्रचंड ताण निर्माण होतो. अनेक ठिकाणी अरुंद रस्ते, घाटमाथ्यावरील तीव्र वळणे, पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या अडचणी आणि वाढत्या वाहतूक दाबामुळे वाहतूक कोंडीची समस्या वारंवार उद्भवत असल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असलेली विविध रस्त्यांची कामे लवकरच मार्गी लावा, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. मंत्रालयातील दालनात आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) शरद राजभोज, महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी, मुख्य अभियंता पुणे श्रीमती प्रज्ञा वाळके, उपसचिव शैलेश बोरसे, साताराचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे भरत बाविस्कर व सचिव राष्ट्रीय महामार्ग संतोष शेलार, महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता बैठकीसाठी दुरदृश्यप्रणाली द्वारे उपस्थित होते. वाई महाबळेश्वर मार्ग. बैठकीत वाई-महाबळेश्वर-पोलादपूर या महत्त्वाच्या पर्यटन मार्गाच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या वाई, महाबळेश्वर व खंडाळा तालुक्यातील विविध अंतर्गत रस्ते, घाटमार्ग आणि संपर्क रस्त्यांच्या कामांच्या सद्यस्थितीची माहिती अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली. विशेषतः मांढरदेवी-वाई मार्ग तसेच शिंदेवाडी-भोर या महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या प्रलंबित कामांबाबत चर्चा करण्यात आली. घाटमार्गांवर आवश्यक त्या ठिकाणी दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, संरक्षक कठडे, सूचना फलक आणि इतर सुरक्षा उपाययोजना तातडीने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरड प्रतिबंधक उपाययोजना, पाणी निचरा व्यवस्था आणि रस्त्यांच्या मजबुतीकरणाच्या कामांनाही प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी चांगल्या रस्ते सुविधांची आवश्यकता अधोरेखित करताना मंत्री महोदय म्हणाले, वाई-खंडाळा-महाबळेश्वर हा परिसर राज्याच्या पर्यटन नकाशावरील महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित, वेगवान आणि सुकर प्रवास अनुभव मिळावा, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रलंबित रस्ते प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक बाबींमध्ये कोणतीही दिरंगाई होऊ देऊ नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांनी विविध रस्ते प्रकल्पांच्या प्रगतीची माहिती सादर केली तसेच कामे गतीने पूर्ण करण्याबाबत आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घ्या यावेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, महाबळेश्वर आणि परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पर्जन्यमान होत असल्याने रस्त्यांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा अत्यंत महत्त्वाचा आहे. रस्ते बांधकाम करताना दीर्घकालीन दर्जेदार कामे होण्याला प्राधान्य द्यावे. घाट परिसरातील रस्ते तीव्र उतार-चढावाचे असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.