Mahabaleshwar News : महाबळेश्वर निवडणूक! कोणाला संधी, कोणाचा हिरमोड? पाहा संपूर्ण राजकीय विश्लेषण

प्रभात वृत्तसेवा
भिलार – जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीमध्ये महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गटात अनुसूचित जमाती आणि तळदेव गटात सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. भिलार पंचायत समिती गणात सर्वसाधारण महिला, मेटगुताड गणात नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तळदेव गणात सर्वसाधारण आणि कुंभरोशी गणात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. या सोडतीमुळे महाबळेश्वर तालुक्याच्या राजकारणाचे चित्र पूर्णपणे बदलले आहे.
बाळासाहेब भिलारे यांच्या निधनानंतर ही पहिलीच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आहे. बाळासाहेब भिलारे यांनी महाबळेश्वर तालुका राष्ट्रवादीचा गड म्हणून अबाधित राखण्यासाठी प्रयत्न केले होते; परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. या आरक्षण सोडतीने महाबळेश्वरच्या राजकारणाचे चित्र बदलले आहे. या आरक्षणामुळे गटव गणातील काही इच्छुकांना लॉटरी लागली असून, अनेकांचे पत्ते गुल झाले आहेत. अनेक मोठ्या हस्तींना धक्का बसला आहे.
अगोदर भिलार गणात सर्वसाधारण महिला आरक्षण जाहीर झाले होते. या गणात बाळासाहेब भिलारे यांची सून तेजस्विनी भिलारे आणि राजेंद्र राजपुरे यांची पत्नी रूपाली राजपुरे यातील एकीला उमेदवारी मिळेल, असे चित्र होते. मात्र, बदललेल्या आरक्षणामुळे या इच्छुकांचे स्वप्न भंगले आहे. या गणामध्ये आता अनुसूचित जमातीचा योग्य उमेदवार निवडण्यात प्रत्येक पक्षाची कसोटी लागणार आहे.
संजूबाबा गायकवाड यांना जॅकपॉट लागल्याची स्थिती आहे. कारण, पंचायत समितीचे सभापतिपद इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने, गायकवाड यांनाच संधी मिळेल, असे बोलले जात आहे. त्याशिवाय तळदेव गटात नागरिकांचा मागास प्रवर्गाचे आरक्षण झाल्याने, येथून संजूबाबा गायकवाड जिल्हा परिषदेतही जाऊ शकतात, अशीही चर्चा सरू झाली आहे. त्यामुळे संजूबाबांना दिवाळीचे मोठे गिफ्ट मिळाले आहे. तळदेव, कुंभरोशी या भागात बाळासाहेब भिलारे यांना मानणारा वर्ग आहे. यामधून नितीन भिलारे निवडणुकीला उभे राहिले, तर ते निवडून येण्याची शक्यता आहे. उमेदवारी मिळाल्यास ते निवडणूक लढतील, अशी चिन्हे दिसत आहेत.
या अगोदर मकरंदआबांनी महाबळेश्वर तालुक्याची सर्व सूत्रे बाळासाहेब भिलारे यांच्याकडे दिली होती. आता तशी परिस्थिती दिसत नाही. राजेंद्र राजपुरे, संजूबाबा गायकवाड, नितीन भिलारे, प्रवीण भिलारे आदी नेते तालुक्याचे राजकारण हाताळत असल्याचे चित्र आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव तालुक्यात वाढत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संजय मोरे यांनीही राजकारणात चांगलाच वचक निर्माण केला आहे.
यामुळे येणारा काळ राष्ट्रवादी व शिवसेनेसाठी कितपत अनुकूल आहे, हे कळणार आहे. राज्यात भाजप, राष्ट्रवादी अजितदादा गट, शिवसेना शिंदे गट यांची महायुती सत्तेत असली, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना हे पक्ष महायुती म्हणून सामोरे जाणार की, स्वबळावर लढणार, याचे चित्र काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.





