Pune District : महाविकास आघाडी निवडणुका एकत्रित लढणार : विजय कोलते

बारामती : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष विजय कोलते यांनी दिली. बारामती येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत पवार कुटुंबातील कोणतीही व्यक्ती नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असण्याची शक्यता नाही. नगरपालिका पातळीवर पक्षाच्या अधिकृत चिन्हावर निवडणुका लढविण्यात काही ठिकाणी अडचणी येत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाविरोधात समविचारी स्थानिक पक्षांची आघाडी तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी ‘बारामती विकास आघाडी’ आणि ‘माळेगाव नगरपंचायत विकास आघाडी’ अशा स्वरूपात स्थानिक आघाड्या उभारल्या जातील.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून जिल्हा पातळीवर मुलाखती घेऊन उमेदवार निश्चित केले जाणार आहेत. माळेगाव कारखाना निवडणुकीच्या वेळी आम्हाला युतीत फसवले गेले, असा उल्लेख करत कोलते म्हणाले, या वेळी मात्र आम्ही स्वतंत्र आघाडीमार्फत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत. माळेगाव नगरपंचायतीसाठी अजित पवार गटाशी आमची युती होणार नाही. तथापि, त्यांच्या गटातील काही स्थानिक व्यक्ती आमच्या आघाडीत सहभागी होऊ शकतात.बारामतीमध्ये बसपा, वंचित आघाडी आदी पक्षांना सोबत घेऊन आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला तालुकाध्यक्ष राजेंद्र जगताप, ज्येष्ठ नेते सतीश खोमणे, गणपत देवकाते, महिला अध्यक्ष आरती शेंडगे, युवा अध्यक्ष बळीराम बेलदार, सोशल मीडिया अध्यक्ष पैगंबर शेख, नितीन तावरे, विनायक शेळके, सचिन लडकत, अमोल गवळी, वसंतराव जगदाळे आदी उपस्थित होते.
जय पवारांबाबत नो कॉमेंट
जय पवार यांच्या नगराध्यक्षपदाबाबत विचारले असता त्यांनी उत्तर देण्यास नकार देत म्हटले, ते अजित पवार यांच्याशी संबंधित प्रश्न आहेत. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून उमेदवार उभा करू. प्रक्रियेला सुरुवात झाली आहे, आणि लवकरच उमेदवार जाहीर करू. लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य नागरिकांमध्ये शरद पवार यांच्याविषयी सहानुभूतीची लाट होती. आमच्याकडे कार्यकर्त्यांची ताकद आहे. आम्ही सत्तेसाठी नव्हे, तर सत्तेच्या समीकरणात महत्त्वाचा घटक बनण्यासाठी प्रयत्नशील आहोत. आमच्या मदतीशिवाय कोणाचीही सत्ता येणार नाही, असे कोलते यांनी ठामपणे सांगितले.





