Rajya Sabha Election : अखेर ठरलं..! मविआचा उमेदवार आज ठरणार, ‘या’ ५ नावांची जोरदार चर्चा
Rajya Sabha Election : मविआकडून शरद पवार, प्रियांका चतुर्वेदी यांच्यासह ५ नावांची चर्चा आहे. संजय राऊत यांनी आज संध्याकाळपर्यंत नाव जाहीर होईल असे सांगितले आहे.

Maha Vikas Aghadi Candidate : राज्यसभेच्या ३७ जागांसाठी येत्या १६ मार्च रोजी मतदान होणार आहे. राज्यातील समीकरणानुसार महायुतीकडे ६ जागा तर महाविकास आघाडीकडे १ जागा आहे. महायुतीतील भाजपने आज चार उमेदवारांची यादी जाहीर केली असून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून पार्थ पवार यांचे नाव निश्चित झाले आहे. शिंदे गटाचाही उमेदवार आज जाहीर होण्याची शक्यता आहे. आता सर्वांचे लक्ष महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडे लागले आहे.
मविआकडून उमेदवार आज निश्चित होणार असून पाच नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे. तर शिवसेना (ठाकरे गट) कडून प्रियंका चतुर्वेदी, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आणि राजन विचारे यांच्या नावांची चर्चा आहे. काँग्रेसकडूनही एक-दोन इच्छुक असल्याची माहिती आहे.
आज संध्याकाळपर्यंत नाव जाहीर होणार (Rajya Sabha Election)
शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार उभा राहील आणि आज संध्याकाळपर्यंत त्याच्या नावाचा निर्णय जाहीर केला जाईल.” त्यांनी स्पष्ट केले की ही जागा मविआची असून तिन्ही पक्ष एकत्र राहिले तरच विजय शक्य आहे.
विधानमंडळातील संख्याबळाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, शिवसेनेकडे २० आमदार, काँग्रेसकडे १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडे १० आमदार आहेत. “आम्ही एकत्र राहिलो तर ही जागा निश्चित जिंकू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Rajya Sabha
राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत ५ मार्च आहे. त्यामुळे मविआकडे निर्णयासाठी अवघे काही तास उरले आहेत. दरम्यान, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेत सविस्तर चर्चा केली. आज संध्याकाळपर्यंत एकमताने निर्णय जाहीर होईल, असे संकेत देण्यात आले आहेत.
“तीन पक्ष तीन उमेदवार देऊ शकत नाहीत. एकच उमेदवार असेल आणि तो सर्वांच्या संमतीनेच जाहीर केला जाईल. सातवी जागा महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही जिंकू,” असा ठाम दावा संजय राऊत यांनी केला. त्यामुळे मविआच्या उमेदवाराच्या नावावर आज अखेर शिक्कामोर्तब होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




