“मॅग्नेट’ टाळणार शेतीमालाचे नुकसान

पुणे – नाशवंत शेतीमालाच्या काढणीनंतर साठवणूक व वाहतुकीचे तंत्र अपेक्षेप्रमाणे विकसित न झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. ही बाब लक्षात घेऊन हे नुकसान टाळण्यासाठी पणन महामंडळाने शेतमालच्या मूल्यवर्धनासाठी ऍग्रीबिझनेस नेटवर्क (मॅगेन्ट) प्रकल्प राबविण्याचे ठरवले आहे. त्याकरिता अशियाई विकास बॅंकेचे आर्थिक सहाय्य घेतले जाणार आहे.

अशियाई विकास बॅंकेचे प्रकल्प समन्वयक मासाहीरो निशीमुरा, सेने किम यांनी कृषी पणन महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत राज्याचा दौरा केला. यादरम्यान त्यांनी नाशिक, सोलापूर व पुणे जिल्ह्यातील निवडक शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधींची भेट घेत निर्यातदार व पायाभूत सुविधांची पाहणी केली. या भेटीदरम्यान फलोत्पादन पिकांच्या काढणीपूर्व उत्पादन पद्धती आणि काढणीपश्‍चात हाताळणी तंत्रज्ञानाचा अभाव जाणवला. ही समस्या सोडवण्याबरोबरच शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी कोणत्या उपाययोजना राबविता येतील, याची चर्चा करण्यात आली. याशिवाय देशांतर्गत व परदेशातील संधींचादेखील या प्रकल्पात विचार केला जाणार आहे. तसा आराखडा तयार केला जाणार आहे. यानुसार केळी, डाळींब, सीताफळ, संत्रा, मोसंबी, पेरू, चिकू, स्ट्रॉबेरी ही फळे व भेंडी, हिरवी व लाल मिरची या फळभाज्यांचा समावेश करण्यात येणार आहे. फळे व भाजीपाला पिकांच्या मूल्य साखळ्यांमध्ये खासगी गुंतवणूक आकर्षित करत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडणे, मागणीनुसार मूल्यवृद्धी, अन्न वितरणाची कार्यक्षमता वाढविण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)