Magnet Production : मॅग्नेट उत्पादनासाठी केंद्र सरकार देणार अनुदान

नवी दिल्ली : रेअर अर्थ मॅग्नेटच्या तुटवड्यामुळे भारतातील विविध महत्त्वाच्या उद्योगांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ही मॅग्नेटचीनकडून मिळविण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून केला जात आहे. दीर्घ पल्ल्यात या क्षेत्रात स्वावलंबी होण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे. आता केंद्र सरकार मॅग्नेट उत्पादकासाठी उत्पादन आधारित अनुदान योजना सुरू करण्याची शक्यता आहे.
केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सांगितले की, विविध मंत्रालयांची आणि उद्योगांची चर्चा चालू आहे. यासंदर्भात एक धोरण 15 ते 20 दिवसात जाहीर केले जाणार आहे. जर अनुदानाची रक्कम 1,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होत असेल तर हा प्रस्ताव कॅबिनेटकडे मंजुरीसाठी पाठवावा लागणार आहे. हैदराबाद येथील एका कंपनीने वर्षाच्या अखेरपर्यंत 500 टन एवढे मॅग्नेट उपलब्ध करण्याचा प्रस्ताव समोर केला आहे. या प्रस्तावाची शहानिशा करण्यात येत आहे. या कंपनीला किती अनुदान द्यावे लागेल यासंदर्भात आकडेमोड करण्यात येत आहे.
भारताला खर्या अर्थाने स्वावलंबी होण्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागेल. मात्र तोपर्यंत गरज भागविण्यासाठी जपान, व्हिएतनाम येथून अशा प्रकारची मॅग्नेट किंवा खनिज उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. भारतात रेअर अर्थ मॅग्नेट प्रक्रिया अणुऊर्जा विभागाकडे एकवटली आहे. जर समन्वयाने प्रयत्न केले तर भारतात दीड हजार टन मॅग्नेट उपलब्ध होऊ शकतात असे समजले जाते.





