Madhuri Dixit: एम.एफ. हुसेन यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या आठवणी माधुरी दीक्षित यांनी केल्या ताज्या, ‘देवदास’च्या शूटिंगचाही सांगितला किस्सा

Madhuri Dixit: भारतीय सिनेसृष्टीत अनेक नाती अशी तयार होतात, जी प्रसिद्धी आणि काळाच्या पलीकडे जातात. अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि चित्रकार एम.एफ. हुसेन यांच्यातील मैत्रीही अशीच एक अनोखी आणि मनाला भिडणारी गोष्ट आहे. अलीकडेच एका मुलाखतीत माधुरी यांनी या मैत्रीच्या अनेक आठवणी शेअर केल्या.
मातृत्वाचा प्रवास पाहण्यासाठी हुसेन अमेरिकेत पोहोचले
माधुरी म्हणाल्या की, त्या जेव्हा डेन्वर (अमेरिका) येथे राहत होत्या, तेव्हा एका दिवशी हुसेन साहेबांनी त्यांना अचानक फोन केला. ते म्हणाले, “तुला एक कलाकार, एक स्टार आणि पत्नी म्हणून पाहिलं… आता तुला आई म्हणून पाहायचं आहे.” इतकं सांगून ते हजारो किलोमीटरचा प्रवास करून अमेरिकेत आले. फक्त इतक्यासाठी की, माधुरीला तिच्या मुलांसह एका नवीन भूमिकेत‘आई’ म्हणून ते पाहू शकतील.
स्तुती आणि टीका स्पष्टपणे करणारे कलाकार
माधुरी यांनी सांगितले की, हुसेन साहेब कधीच स्तुती किंवा टीका करण्यास मागेपुढे पाहत नसत. त्या म्हणाल्या, “कधी ते एखाद्या सीनची खूप प्रशंसा करायचे, तर कधी सरळ सांगायचे हे मला विशेष आवडलं नाही.”
एकदा माधुरीने त्यांना त्यांच्या एका चित्राबद्दल अर्थ विचारला. त्यावर हुसेन म्हणाले, “चित्र मी काढलं… अर्थ तू शोध. कलाकार फक्त सुरुवात करतो, कथा प्रेक्षक पूर्ण करतात.”
‘देवदास’ची आठवण – ‘डोला रे डोला’ म्हणजे परीक्षा
संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांमध्ये भव्यता ही ओळख असते, पण त्यामागची कष्टांची पराकाष्ठा मात्र कलाकारांनाच ठाऊक. ‘देवदास’च्या शूटिंगबद्दल बोलताना माधुरी म्हणाल्या की, प्रसिद्ध ‘डोला रे डोला’ या गाण्याचे चित्रीकरण हे त्यांच्यासाठी आणि ऐश्वर्या राय यांच्यासाठी खरंच एका परीक्षेसारखे होते.
जड दागिने, वजनदार लहंगा आणि कठीण कोरिओग्राफी या सगळ्यांमध्ये शूटिंग करणे खूप अवघड होते. माधुरी म्हणाल्या, “आम्ही दोघी एकमेकींकडे बघून म्हणायचो अरे देवा, किती जड आहे हे!”
‘मार डाला’ या गाण्याची शूटिंगही तितकीच कष्टदायक होती. पण चित्रपटाच्या भव्यतेनुसार प्रत्येक पोशाख पारंपरिक आणि वास्तविक दिसणे आवश्यक होते, असे त्या म्हणाल्या.





