Madhuri Dixit: बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षित आज तिचा ५९वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनय, सौंदर्य आणि अप्रतिम नृत्यशैलीमुळे गेली अनेक वर्षे ती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. मात्र माधुरीला खऱ्या अर्थाने सुपरस्टार बनवणारा टप्पा म्हणजे १९८८ मध्ये आलेल्या तेजाब या चित्रपटातील ‘एक दो तीन’ हे गाणं. तब्बल ७ मिनिटे २ सेकंद लांबीचं हे गाणं आजही बॉलिवूडच्या सर्वात आयकॉनिक गाण्यांपैकी एक मानलं जातं. माधुरी दीक्षितने वयाच्या अवघ्या १७व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. तिने १९८४ मध्ये आलेल्या ‘अबोध’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. मात्र सुरुवातीच्या काळात तिच्या अनेक चित्रपटांना अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे करिअरमध्ये मोठं यश मिळेल का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण १९८८ मध्ये आलेल्या ‘तेजाब’ने तिचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. Madhuri Dixit’s ‘Ek Do Teen’ from Tezaab या चित्रपटात माधुरीसोबत अनिल कपूर मुख्य भूमिकेत होता. चित्रपटातील ‘एक दो तीन’ हे गाण रिलीज होताच संपूर्ण देशाला अक्षरशः वेड लावलं. प्रत्येकाच्या ओठांवर हेच गाणं ऐकू येत होतं. विशेष म्हणजे या गाण्यातील माधुरीच्या जबरदस्त डान्स स्टेप्स, चेहऱ्यावरील हावभाव आणि तिचा आत्मविश्वास यामुळे प्रेक्षक पूर्णपणे भारावून गेले. हे गाणं माधुरीच्या करिअरचं टर्निंग पॉइंट ठरलं. या एका गाण्यामुळे ती रातोरात स्टार बनली. आजही अनेक डान्स शो, स्टेज परफॉर्मन्स आणि कार्यक्रमांमध्ये ‘एक दो तीन’ हे गाणं आवर्जून वाजवलं जातं. त्या काळात या गाण्याची लोकप्रियता इतकी प्रचंड होती की माधुरीला ‘डान्सिंग क्वीन’ म्हणून ओळख मिळाली. या गाण्यामागे माधुरीची प्रचंड मेहनत होती. प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, या गाण्यासाठी माधुरीने जवळपास ३० दिवस रिहर्सल केली होती. सरोज खान यांनी तिला हे गाणं कठीण असल्याचं सांगितलं होतं, पण माधुरीने कोणतीही भीती न बाळगता “मी तयार आहे” असं उत्तर दिलं होतं. तिची ही मेहनत आणि समर्पणच पुढे तिच्या यशाचं मोठं कारण ठरलं. Madhuri Dixit ‘तेजाब’नंतर माधुरी दीक्षित बॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींसाठी मोठी स्पर्धा बनली. त्यानंतर तिने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. राम लखन, दिल, साजन, बेटा, खलनायक, हम आपके हैं कौन, दिल तो पागल है आणि देवदास यांसारख्या चित्रपटांमधून तिने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. आजही ‘एक दो तीन’ हे गाणं आणि माधुरीचा डान्स चाहत्यांच्या मनात तितकाच ताजा आहे.