Madhuri Dixit : “माधुरी दीक्षित ‘सेकंड ग्रेड’ अभिनेत्री, तिचा काळ संपला…”, काँग्रेसच्या ‘या’ आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

राजस्थानचे विरोधी पक्षनेते टीकाराम जूली यांनी लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. बुधवारी राजस्थान विधानसभेत बोलताना काँग्रेस आमदार टीकाराम जूली यांनी इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी (आयफा) पुरस्कारांवर होणाऱ्या खर्चाबाबत राज्य सरकारला सवाल केला. या पुरस्कार सोहळ्याला तुलनेने कमी बॉलीवूड स्टार्स उपस्थित होते आणि या सोहळ्याचा राज्यावर काय परिणाम झाला असे अनेक प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केले.
“आयफा सोहळ्याचा आपल्याला काय फायदा झाला? किती मोठे स्टार्स उपस्थित राहिले? त्यांनी कोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली? ते कोणत्याही पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी गेले नाहीत आणि या सोहळ्याला कोणते मोठे कलाकार हजर होते? शाहरुख खान वगळता, सर्व सेकंड ग्रेड कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. शाहरुख खान सोडल्यास टॉप ग्रेडचा एकही अभिनेता तिथे उपस्थित नव्हता.” असे टीकाराम जूली विधानसभेत म्हणाले.
टीकाराम बोलत असताना विधानसभेच्या एका सदस्याने माधुरी दीक्षितचं नाव घेतलं. त्यावर बोलताना टीकाराम म्हणाले “माधुरी दीक्षित आता सेकंड ग्रेड अभिनेत्री आहे. तिचा काळ आता निघून गेला आहे. ती ‘दिल’ आणि ‘बेटा’ यांसारखे चित्रपट आले तेव्हा मोठी स्टार होती. आता कोणतेही मोठे स्टार्स उपस्थित राहिले नव्हते. अमिताभ बच्चन सुद्धा आले नव्हते असे टीकाराम म्हणाले.
उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी दिले प्रत्युत्तर
“प्रत्येक कलाकाराचा आणि त्यांच्या कलेचा आदर केला पाहिजे; एका महिला कलाकाराबद्दल असं बोलणं चुकीचं आहे. ते सभागृहात जे बोलले ते निंदनीय आहे.” असे म्हणत उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी टीकाराम जूली यांनी माधुरीबद्दल केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिले आहे.
‘आयफा 2025’ पुरस्कार सोहळ्याला कोण उपस्थित होते?
जयपूरमध्ये पार पडलेल्या ‘आयफा 2025’ पुरस्कार सोहळ्यात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. यामध्ये करण जोहर, करीना कपूर खान, शाहिद कपूर, कार्तिक आर्यन, कतरिना कैफ, ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा समावेश होता.





