“इंडस्ट्रीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले..” सुशांत सिंहबाबत मधुर भांडारकरचे मोठे वक्तव्य

मुंबई – चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांनी चांदनी बार, फॅशन, पेज 3 सारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. मधुर भांडारकर सध्या दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे. जून 2020 मध्ये सुशांतने आपल्या राहत्या घरी आत्महत्या करून आपले जीवन संपवले होते.
दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या अकाली निधनानंतर चित्रपटसृष्टीबद्दल प्रेक्षकांचा राग खूप वाढला आहे असं मधुर भांडारकर यावेळी म्हणाले. मधुर भांडारकर यांनी मनीष पॉल यांच्याशी पॉडकास्टवर केलेल्या चर्चेमध्ये विविध विषयांवर भाष्य केले. बहिष्काराची संस्कृती चित्रपट उद्योगासाठी नवीन नाही आणि बहिष्कार असूनही लोक चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जातात. असे यापूर्वी अनेकदा घडले आहे. ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला आणि त्यांनी तो पहिला असंही भांडारकर यावेळी म्हणाले.
भांडारकर म्हणाले,”सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर हा बहिष्कार मोठ्या प्रमाणात सुरू झाला. कदाचित इंडस्ट्रीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले असेल. खरं तर सुशांत सिंग राजपूत नॉन फिल्मी पार्श्वभूमीचा होता आणि तो खूप संघर्षानंतर इथपर्यंत पोहोचला होता. एवढ्या लवकर त्यांचा मृत्यू झाला हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांच्या अकाली निधनाने जनमानसातील संताप आणखी वाढला. हे जनमत आहे”.
मला वाटते की ही बहिष्कार संस्कृती एक फेज आहे. चित्रपट चांगला असेल आणि आशय सशक्त असेल तर लोक नक्कीच बघतात. लोकांनी साऊथचा सुपरहिट चित्रपट ‘कंतारा’, बॉलीवूड चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’, ‘भूल भुलैया 2’ पाहिला आणि हे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले. मधुर भांडारकर म्हणाले की, चित्रपटांवर बहिष्कार टाकणारा प्रेक्षकांचा एक छोटा गट आहे. लोकांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे असं स्पष्ट मत यावेळी भांडारकर यांनी व्यक्त केलं.





