मदनदास देवी यांनी मनुष्य जोडण्याचे कार्य केले; श्रद्धांजली अर्पण करताना मान्यवरांनी उलगडल्या भावना

पुणे – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सर कार्यवाह मदनदास देवी हे स्वयंसेवकांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे पालक होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बांधणीत त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांचे मार्गदर्शन ज्याला घ्यायचे असेल त्याच्यासाठी ते सदैव सहजतेने उपलब्ध होत असत. त्यांनी सदैव मनुष्य जोडण्याचे कार्य केले, अशा शब्दांत मदनदास देवी यांना मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी रा. स्व. संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश सोनी आणि अनिरुद्ध देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, माजी प्रांत कार्यवाह विनायकराव थोरात, अभाविपचे अखिल भारतीय संघटन मंत्री आशिष चौहान, सहकार भारतीचे राष्ट्रीय संघटन मंत्री संजय पाचपोर, ज्येष्ठ कार्यकर्त्या गीताताई गुंडे, गिरीश प्रभुणे, विनोद तावडे, आशिष शेलार यांसह संघ स्वयंसेवक यावेळी उपस्थित होते.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची वैचारिक बैठक तयार करण्याचे आणि संघटनेचे तत्वज्ञान उत्तमप्रकारे कार्यकर्त्यांमध्ये रुजवण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम मदनदासजी यांनी केले. संघटनेला त्यांनी वैचारिक अधिष्ठान दिले. कार्यकर्त्याच्या केवळ संघटनेतील कामाची नाही, तर त्याच्या संपूर्ण जीवनाची ते काळजी घेत असत. – मिलिंद मराठे, माजी राष्ट्रीय अध्यक्ष, अ.भा.वि.प.
मदनदासजी देवी हे सदैव व्यक्तीच्या मनाला स्पर्श करत असत. संघटनेचे आणि मनुष्य जोडण्याचे काम करताना खूप काही सहन करावे लागते. हे सोपे नाही. अशावेळी आंतरिक ज्वलन सहन करत असताना देखील त्यांनी स्वतः स्थितप्रज्ञाप्रमाणे आयुष्य व्यतीत केले. जातानादेखील ते आनंददायी आणि आनंदी होते. त्यांनी केवळ संघटनेचे काम केले असे नाही, तर मनुष्य जोडण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. ते कार्यकर्त्यांना आपले मानायचे, त्यांना सांभाळायचे. बालवयातील शाखेच्या मित्रांपासून ते विविध संघटनांच्या प्रमुखांपर्यंतच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा निकटचा संपर्क होता. ते सर्वांची काळजी करायचे. प्रत्येकाची त्यांना संपूर्ण माहिती असायची.
– डॉ. मोहन भागवत, सरसंघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
देशातील हजारो कार्यकर्त्यांना मदनदासजी यांनी कार्याची दृष्टी दिली, त्यांना जीवनदिशा दिली, त्यांच्यावर संस्कार केले आणि जीवनाला उद्देश दिला. साऱ्या युवकांना ते आपले वरिष्ठ सहकारी आहेत, असेच नेहमी वाटत असे. संघटनेसमोर अनेक अडचणी असतानाही संघटनेचा विचार कसा पुढे नेता येऊ शकतो, हे आम्ही त्यांच्याकडे पाहून शिकलो. संघटनशास्त्राचा त्यांचा सखोल अभ्यास होता. बैठक कशी घ्यायची, वार्तालाप कसा करायचा अशा अनेक गोष्टींचे धडे ते कार्यकर्त्यांना देत असत. त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत राहणे आणि तो मार्ग अधिक सुदृढ करणे, ही त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. – जे. पी. नड्डा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप





