M.K.Stalin : मतचोरी उघड केल्यामुळे राहुल गांधी लक्ष्य केलंय जातंय; स्टॅलिन यांची भाजपवर टीका

मुझफ्फरपूर : मी तामिळनाडूहून माझ्या भावांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहे. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाची मत चोरी उघडकीस आणली आहे. राहुल गांधींनी प्रतिज्ञापत्र द्यावे किंवा माफी मागावी असे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणत आहेत. राहुल गांधी या सगळ्याला कधी घाबरतील का? भाजपने निवडणुकांना कसे विनोद बनवले आहे हे राहुल यांनी उघड केल्यामुळे आज भाजप त्यांच्यावर हल्ला करत आहे, अशी टीका तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केली.
स्टॅलिन यांनी बिहारमधील मुझफ्फरपूर येथे मतदार हक्क रॅलीमध्ये भाग घेतला. रॅलीमध्ये त्यांनी मत चोरीच्या मुद्द्यावरून भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला. यावेळी कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव उपस्थित होते. ते म्हणाले, जर निवडणुका निष्पक्ष पद्धतीने झाल्या तर एनडीएचा पराभव होईल. त्यांनी (केंद्राने) निवडणूक आयोगाला रिमोट-कंट्रोल्ड कठपुतळी बनवले आहे.
बिहारमधील लोकांची नावे मतदार यादीतून काढून टाकणे योग्य नाही. राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची मैत्री ही केवळ राजकीय नाही, तर ते दोन भावांचे नाते आहे. ही मैत्री त्यांना विजयी करेल. लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमचे नेते करुणानिधी आणि लालू यादव खूप चांगले मित्र होते. लालू प्रसाद यादव हे देशातील सर्वात प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत, कारण ते कधीही भाजपला घाबरले नाहीत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांचा मुलगा तेजस्वी यादव देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहे असेही स्टॅलिन यावेळी म्हणाले.





