M.K.Stalin : भाजप, अण्णाद्रमुकचे मनसुबे फोल ठरतील; एम.के.स्टॅलिन यांचा दावा

चेन्नई : मतदार याद्या पडताळणीच्या (एसआयआर) माध्यमातून निवडणूक जिंकण्याचे भाजप-अण्णाद्रमुक युतीचे मनसुबे आहेत. मात्र, ते फोल ठरतील. जनतेचा मताधिकार हिरावून त्या युतीला विजय मिळणार नाही, असा दावा तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांनी रविवारी केला. पडताळणी प्रक्रिया देशभर राबवण्याच्या हालचाली निवडणूक आयोगाने सुरू केल्या आहेत.
त्या पार्श्वभूमीवर, स्टॅलिन यांनी द्रमुकच्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक पत्र जारी केले. त्यामध्ये संबंधित प्रक्रियेला असणारा विरोध त्यांनी अधोरेखित केला. निवडणुकीत लाभ मिळवण्यासाठी तमिळनाडूतही एसआयआरचा वापर केला जाऊ शकतो. तसा इशारा द्रमुक आणि इतर विरोधी पक्षांचा समावेश असणाऱ्या इंडिया आघाडीकडून दिला जात आहे. एसआयआरच्या माध्यमातून मोठ्या संख्येने मतदारांची नावे वगळून निवडणूक जिंकण्याचे आडाखे भाजप-अण्णाद्रमुक युती मांडत आहे.
निवडणुकीच्या मैदानात जनतेला सामोरे जाण्याची ताकद युतीमध्ये नाही. त्यामुळे जनतेचा मताधिकार हिसकावून जिंकण्याची मनीषा युती बाळगून आहे. मात्र, तमिळनाडूच्या बाबतीत युतीचे अंदाज चुकीचे ठरतील, असे भाकीत त्यांनी केले. स्टॅलिन यांनी मांडलेली भूमिका पाहता एसआयआरवरून द्रमुक आक्रमक होणार असल्याचे सूचित होत आहे.





