M.K.Stalin : काँग्रेससोबतची आघाडी अबाधित; मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी केले स्पष्ट
M.K.Stalin : द्रमुक आणि काँग्रेसमधील आघाडी पूर्णपणे अबाधित असून फूट पडल्याच्या बातम्या या केवळ अफवा आहेत, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन (M.K.Stalin) यांनी बुधवारी स्पष्ट केले.

M.K.Stalin : द्रमुक आणि काँग्रेसमधील आघाडी पूर्णपणे अबाधित असून फूट पडल्याच्या बातम्या या केवळ अफवा आहेत, असे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन (M.K.Stalin) यांनी बुधवारी स्पष्ट केले. युती सरकारची शक्यता त्यांनी ठामपणे नाकारत, तामिळनाडूच्या राजकीय परंपरेला सत्तावाटप शोभत नसल्याचे सांगितले.
एका कार्यक्रमात बोलताना स्टॅलिन म्हणाले, सरकारमध्ये सत्ता वाटणे तामिळनाडूला मानवणारे नाही. काँग्रेसलाही हे चांगलेच माहीत आहे. काही लोक जाणीवपूर्वक आमच्यात फूट पाडण्यासाठी सत्तावाटपाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. ही विरोधकांची युक्ती कधीही यशस्वी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
द्रमुक–काँग्रेस युतीबाबत कोणताही गोंधळ नसल्याचे स्पष्ट करताना स्टॅलिन म्हणाले की, राजकारणापलीकडे, राहुल गांधींना मी माझा भाऊ मानतो आणि तेही मला तसाच मानतात. आमच्या आघाडीमध्ये पूर्ण सामंजस्य आहे. इतरांना अपेक्षित असलेले विभाजन कधीही होणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
काँग्रेसकडून जागावाटपाच्या चर्चेला विलंब झाल्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आल्यानंतर स्टॅलिन यांच्या या वक्तव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. मंगळवारी एआयसीसीचे तामिळनाडू प्रभारी गिरीश चोडणकर यांनी द्रमुककडून जागावाटप समिती स्थापन करण्यात झालेल्या विलंबाबद्दल चिंता व्यक्त केली होती. मात्र, द्रमुकने २२ फेब्रुवारीपासून वाटाघाटी सुरू करण्यासाठी पॅनेल जाहीर केले आहे.
त्यांना शुन्य जागा मिळतील…
द्रमुक मंत्री आर. एस. राजकन्नप्पन आणि काही काँग्रेस नेत्यांमधील शाब्दिक युद्धामुळे आघाडीबाबत शंका वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर स्टॅलिन यांनी भूमिका स्पष्ट करत सांगितले की, आगामी विधानसभा निवडणुका २०२१ पेक्षा अधिक कठीण नसतील.
केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी म्हटले की भाजपचा फॅसिझम तामिळनाडूमध्ये कधीही जिंकणार नाही. केंद्रीय अर्थसंकल्पात तामिळनाडूसाठी काहीही दिले नसल्याचा आरोप करत, भाजपला आगामी निवडणुकीत शून्य जागा मिळतील, असा दावा त्यांनी केला.





