No-Confidence Motion: बीारएस पक्षानेही दिला मोदींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव

नवी दिल्ली – तेलंगणातील बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती या पक्षानेही स्वतंत्रपणे मोदी सरकारच्या विरोधात आज अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या पक्षाचे लोकसभेत नऊ सदस्य आहेत. या पक्षाचे नेते नागेश्वर राव यांनी सांगितले की, मी आमच्या पक्षाच्या वतीने अविश्वास ठराव मांडला आहे. अधिवेशन सुरू झाल्यापासून सर्व विरोधी पक्षांचे नेते मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी करत होते.
जर पंतप्रधान यावर बोलले तर लोकांमध्ये शांतता नांदेल. देश म्हणून आम्ही प्रयत्न केले.पण सरकारने प्रतिसाद दिलेला नाही त्यामुळे आम्ही स्वतंत्रपणे यावर नोटीस जारी केली आहे. बीआरएस हा पक्ष 26 विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा भाग नाही. तो भाजपच्याही बाजूने नाही. पण इंडिया आघाडीच्या प्रस्तावाच्या संबंधात कोणत्या बाजूने मतदान करणार हा भाग अजून त्यांनी स्पष्ट केलेले नाही. कदाचित हे दोन्हीं अविश्वास प्रस्ताव एकाचवेळी चर्चेला येऊ शकतात.
दरम्यान लोकसभेत बारा सदस्य असलेल्या बिजू जनता दलानेही अविश्वास प्रस्तावावर आपली भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही. हा पक्षही विरोधी आघाडीत नाहीं आणि तो भाजपबरोबरही नाही. आंध्रातील वायएसआरसीपी पक्षाने मात्र अविश्वास प्रस्तावाच्या विरोधात मतदान करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 20 जुलै रोजी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून मणिपुरच्या विषयामुळे दोन्ही सभागृहे वारंवार तहकूब होत आहेत.
कॉंग्रेसच्या सूत्रांनी म्हटले आहे की गौरव गोगोई हे ईशान्येकडील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि त्यांनी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस देणे हे मणिपूर या जातीय हिंसाचारग्रस्त राज्यावर विरोधकांचे लक्ष असल्याचेच प्रतीक आहे.





