LPG Supply : एलपीजीचा पुरवठा सुरू ! होर्मुझ सामुद्रधुनीतून आणखी एक जहाज दाखल
ग्रीन सान्वीने होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली असून, त्यात २५ खलाशांसह ४६,६५० टन एलपीजीचा माल आहे.

LPG Supply : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक जहाज वाहतुकीवर परिणाम होत असतानाच भारताकडे येणाऱ्या एलपीजी टँकर ग्रीन सान्वीने रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाची असलेली होर्मुझ सामुद्रधुनी यशस्वीरित्या पार केली असून, हे जहाज सध्या मंगळूर बंदरात पोहोचले आहे. यावरून प्रादेशिक स्तरावर अडथळे असतानाही इंधन आणि एलपीजीचा पुरवठा सुरूच असल्याचे संकेत मिळत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रीन सान्वीने होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षितपणे पार केली असून, त्यात २५ खलाशांसह ४६,६५० टन एलपीजीचा माल आहे.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर या जलमार्गातून प्रवास करणारा ग्रीन सान्वी हा भारतीय ध्वज असलेला सातवा एलपीजी टँकर असून सात वर्षांतील इराणकडून झालेली ही पहिलीच एलपीजी खरेदी आहे. या टँकरमध्ये सुमारे ४४,००० टन एलपीजी असून तो मंगळूर येथे उतरविण्यात येत आहे.
या आठवड्याच्या सुरुवातीला दोन जहाजांमधून सुमारे ९४,००० टन एलपीजी सुरक्षितपणे देशात आला आहे. त्यापूर्वी भारतीय ध्वज असलेले चार एलपीजी टँकरने होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे प्रवास केला होता.
यामुळे गेल्या काही दिवसांत निर्माण झालेली भीषण एलपीजी टंचाई कमी होण्यास मदत होणरर आहे. गेल्या वर्षी भारताने ३३.१५ दशलक्ष टन एलपीजीचा वापर केला. ज्यापैकी सुमारे ६० टक्के मागणी आयातीद्वारे पूर्ण झाली.
दरम्यान, होर्मुझ सामुद्रधुनीच्या पूर्वेकडील पर्शियन गल्फ परिसरात सध्या किमान १७ भारतीय ध्वजधारी जहाजे कार्यरत आहेत. यामध्ये एलपीजी वाहक, कच्च्या तेलाचे टँकर्स, एलएनजी टँकर, केमिकल टँकर, कंटेनर जहाजे, बल्क कॅरियर्स तसेच देखभालीसाठी थांबवलेली जहाजे यांचा समावेश आहे.






