LPG Shortage – आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मागे पडलेले पारंपरिक रॉकेल स्टोव्ह पुन्हा एकदा बाजारात सक्रिय झाल्याचे चित्र देहूरोड आणि परिसरात पाहायला मिळत आहे. गॅस इंधनाच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेक लहान-मोठ्या व्यावसायिकांनी या जुन्या साधनाकडे वळण्यास सुरुवात केली असून, त्यामुळे स्टोव्हला नव्याने जीवदान मिळाल्याचे दिसून येत आहे. एकेकाळी प्रत्येक घरातील स्वयंपाकघराचा अविभाज्य भाग असलेला स्टोव्ह, कालांतराने गॅस शेगड्यांच्या आगमनामुळे बाजूला पडला होता. त्याआधी चुलीवर स्वयंपाक करण्याची परंपरा होती. ग्रामीण भागात अजूनही काही प्रमाणात चुलीचा वापर दिसून येतो, मात्र शहरीकरणाच्या लाटेत चुलींची जागा रॉकेल स्टोव्हने घेतली आणि नंतर गॅस शेगड्यांनी ती पूर्णपणे काबीज केली. एलपीजी गॅसची सहज उपलब्धता, स्वच्छता, वेळेची बचत आणि सोयीस्कर वापर यामुळे गॅस शेगड्या सर्वत्र प्रचलित झाल्या. घरगुती वापरासह चहा टपऱ्या, हॉटेल्स, वडापाव-भजी गाड्या, नाश्त्याचे स्टॉल आणि इतर खाद्य व्यवसाय करणाऱ्यांनीही गॅस शेगड्यांवर पूर्णपणे अवलंबून राहण्यास सुरुवात केली. त्यामुळे गॅसवर स्वयंपाक करणे सोपे आणि जलद असल्याने व्यवसायिकांच्या कामकाजाला गती मिळाली. मात्र सध्याच्या इंधन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीने वेगळे वळण घेतले आहे. गॅस सिलेंडरची अनियमित उपलब्धता, वाढती मागणी आणि पुरवठ्यातील अडथळे यामुळे अनेकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः रोजंदारीवर चालणाऱ्या लघुउद्योजकांसाठी ही समस्या अधिक गंभीर ठरत आहे. गॅस सिलिंडर टंचाई चहा टपऱ्या, नाश्त्याचे गाडे, रस्त्यावरील खाद्य व्यवसाय यांचे संपूर्ण कामकाज गॅसवर अवलंबून असल्याने गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यास त्यांचा व्यवसाय ठप्प होण्याची शक्यता निर्माण होते.गॅस इंधनाच्या तुलनेत स्टोव्ह वापरताना काही मर्यादा असल्या, तरी सध्याच्या परिस्थितीत तो एक प्रभावी पर्याय म्हणून समोर आला आहे. स्टोव्हवर स्वयंपाक करताना वेळ अधिक लागतो, तसेच धूर आणि वास यामुळे काही अडचणी निर्माण होतात; मात्र गॅस उपलब्ध नसताना व्यवसाय थांबवण्यापेक्षा स्टोव्हचा वापर करणं अधिक फायदेशीर ठरत आहे. काही ठिकाणी होतोय डिझेलचा वापर रॉकेलच्या उपलब्धतेतही काही प्रमाणात अडचणी येत असल्याने काही व्यावसायिकांनी स्टोव्ह चालवण्यासाठी डिझेलचा वापर सुरू केला आहे. डिझेलचा वापर करताना काही तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्या, तरी परिस्थितीचा सामना करण्यासाठी हा पर्याय स्वीकारला जात आहे. डिझेलमुळे स्टोव्हचा बर्नर लवकर खराब होतो, तसेच ज्वलन प्रक्रियेत अडथळे येतात. मात्र व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी हा तडजोडीचा मार्ग निवडला जात आहे. बाजारपेठेत वाढती मागणी स्थानिक बाजारपेठेत स्टोव्हशी संबंधित साहित्याची मागणीही वाढली आहे. स्टोव्हचे बर्नर, पंप, नॉझल, वॉशर यांसारख्या सुट्या भागांची विक्री वाढली असून, दुरुस्ती करणाऱ्या कारागिरांना पुन्हा काम मिळू लागले आहे. काही वर्षांपूर्वी जवळजवळ बंद पडलेला हा व्यवसाय पुन्हा सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. जुन्या स्टोव्हना नव्याने दुरुस्त करून वापरात आणण्याचे प्रमाण वाढले आहे.