नवी दिल्ली -स्वयंपाकासाठी घरगुती वापर होणाऱ्या 14.2 किलो वजनी गॅस (एलपीजी) सिलिंडरच्या दरात बुधवारी 25 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सामान्य जनतेला इंधन दरवाढीचा आणखी एक दणका बसला आहे.
याआधी 1 ऑगस्टला विनाअनुदानित गॅस सिलिंडर 25 रुपयांनी महागला. त्यापाठोपाठ अनुदानित सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे. याआधी विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात वाढ झाली त्यावेळी अनुदानित सिलिंडरच्या दरात कुठला बदल करण्यात आला नाही.
त्यावेळी संसदेचे पावसाळी अधिवेशन चालू असल्याने विरोधकांनी केंद्र सरकारवर टीका करू नये, या उद्देशातून दरवाढ टाळण्यात आल्याचे मानले जाते. मात्र, आता सार्वजनिक इंधन कंपन्यांनी अनुदानित सिलिंडरच्या दरवाढीचे पाऊल उचलले.
मागील महिन्यातही (1 जुलै) अनुदानित सिलिंडर 25 रुपये 50 पैशांनी महागला होता. चालू वर्षात आतापर्यंत अनुदानित सिलिंडर 165 रुपयांनी महागला आहे. आता दिल्ली आणि मुंबईत सिलिंडर 859 रुपयांना उपलब्ध होईल. मार्च 2014 मध्ये सिलिंडर 410 रुपयांना मिळत होता. म्हणजेच 7 वर्षांत सिलिंडर दरात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.