LPG Black Marketing – आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा फटका सामान्य नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांना बसत असतानाच, काही वितरकांनी याचा मोठा काळाबाजार सुरू केला आहे. अधिकृतपणे पुरवठा ठप्प असल्याचे सांगून, पडद्यामागून १७०० रुपयांचे व्यावसायिक सिलिंडर चक्क अडीच ते तीन हजार रुपयांना विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केंद्र सरकारने घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य देत व्यावसायिक सिलिंडरच्या वितरणावर निर्बंध घातले आहेत. मात्र, या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही वितरकांनी उपलब्ध सिलिंडरची साठेबाजी केली आहे. गरजू हॉटेल चालक, खानावळी आणि लघुउद्योजकांना सिलिंडरची अत्यंत गरज असल्याने त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा किंमत उकळली जात आहे. १७०० रुपयांच्या मूळ किमतीपेक्षा तब्बल १२०० ते १३०० रुपये जास्तीचे मोजून व्यावसायिक सिलिंडर खरेदी करण्याची वेळ हॉटेल चालकांवर आली आहे. बुकिंग केले तर नो स्टॉक असे उत्तर मिळते; पण जास्तीचे पैसे द्यायची तयारी दाखवली की सिलिंडर उपलब्ध होतो,अशी तक्रार काही हॉटेल व्यावसायिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर केली आहे. टपरी चालक आणि छोटे विक्रेते इतकी मोठी रक्कम देऊ शकत नसल्याने त्यांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, तर मोठे हॉटेल चालक ग्राहकांकडून जास्तीचे पैसे उकळून हा खर्च भरून काढण्याची शक्यता आहे. सध्या काही टपरी चालकांकडील गॅस सिलिंडर संपत आला आहे. त्यांनी सांगितले, की काळ्या बाजारातून एवढ्या महाग दराने गॅस सिलिंडर घेणे शक्य नाही. इराण-इस्रायल युद्ध त्यामुळे आता एक-दोन दिवसांत टपरी बंद करावी लागणार आहे. केटरिंग चालक आणि हॉटेल मालकांना आपले व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी गॅसची नितांत गरज आहे. अधिकृत पुरवठा नसल्याने ते नाईलाजाने या रीफिल केलेल्या आणि अनधिकृत मार्गाने येणाऱ्या सिलिंडरसाठी मोठी किंमत मोजत आहेत. या प्रक्रियेत सर्वसामान्यांच्या घरगुती सिलिंडरच्या कोट्यावरही दरोडा टाकला जात आहे. आचारी आमचा, सिलिंडर तुमचा व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याचा मोठा फटका आता लग्नसराईला बसत आहे. मार्च -एप्रिल महिन्यातील लग्नांच्या तारखांसाठी केटरिंग व्यावसायिकांनी आगाऊ रकमा घेऊन बुकिंग केले आहे. मात्र, आता ऐन वेळी व्यावसायिक सिलिंडर मिळेनासे झाल्याने पाहुण्यांना जेवण कसे तयार करायचे, असा सवाल केटरिंग चालक विचारत आहेत. आचारी ठरले आहेत, मेन्यू ठरला आहे आणि किराणा मालही भरला आहे. मात्र, सिलिंडर गॅस एजन्सीकडे उपलब्ध नसल्याने मोठी कोंडी झाली आहे. सिलिंडरअभावी बुकिंग रद्द करणे शक्य नसल्याने अनेक केटरिंग चालकांनी आता एक नामी युक्ती शोधली आहे. ज्यांच्या घरचे लग्न आहे, त्या यजमानांनाच गॅस सिलिंडरची सोय करण्याची गळ केटरिंग चालक घालत आहेत. आम्ही जेवण बनवून देतो; पण गॅस तुम्ही पुरवा, अशी भूमिका काही व्यावसायिकांनी घेतली आहे. मग इतरांकडे गॅस येतो कुठून? ज्या प्रामाणिक गॅस एजन्सी चालकांकडे कंपनीकडून पुरवठा आलेला नाही, त्यांनी आपले वितरण पूर्णपणे बंद ठेवले आहे. मात्र, याच टंचाईच्या काळात काही ठराविक एजन्सी किंवा मध्यस्थ बिनदिक्कतपणे व्यावसायिक सिलिंडर पोहोचवत आहेत. आमच्याकडील कोटा संपलेला असताना इतरांना हा साठा मिळतोच कुठून, असा सवाल आता नियमानुसार काम करणाऱ्या एजन्सी चालकांनी उपस्थित केला आहे. घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस बेकायदेशीरपणे व्यावसायिक सिलिंडरमध्ये रीफिल करून तो चढ्या दराने विकला जात असल्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.