Love Birds Cafe Ravet | पिंपरी चिंचवड शहरातील काही कॅफेमध्ये एकांताच्या नावाखाली नको ते घडू लागले आहे. मुला-मुलींना या कॅफेमध्ये एकांत मिळवून दिला जात आहे. यामुळे तासन्तास गप्पा मारण्याच्या नावाखाली या मुलांकडून अंधाऱ्या खोलीत भलतंच घडतंय. पण, या कॅफेच्या आडून हा सारा प्रकार दडून जात असल्यामुळे पालकही अनभिज्ञ राहत आहेत. या कॅफेमधील अंधाऱ्या कोठडीतील काळे सत्य आता पोलिसांनीच समाजासमोर आणले आहे.
तरुण-तरुणींना डोळ्यासमोर ठेवून केबिन कॅफे संस्कृती उदयास आली. कॅफेमध्ये मिळणाऱ्या कोल्ड आणि हॉट कॉफीपेक्षा कॅफेतील जागा कशी हॉट राहील, अशी रचना करण्याकडे कॅफे चालकांचा कटाक्ष दिसतोय. उघड्यावर, हवेशीर कॉफी घेण्यात येणारी मजा अंधाऱ्या कोठडीपेक्षा म्हणे निराळी असते.
म्हणूनच कॅफेमध्ये कपल्ससाठी रंगीबेरंगी कप्पे केले जात आहेत. दहा बाय वीसच्या गाळ्यातही स्वतंत्र आसन व्यवस्थाही करण्यात आल्यात. कॅफेमध्ये गेल्यानंतर काऊंटरवर तुम्हांला लखलखीत सूर्यप्रकाश दिसेल. पण, तुम्हांला आतमध्ये एन्ट्री मिळाल्यानंतर आपण एखाद्या थिएटरमध्ये आलो की काय, असा भरदिवसा नक्कीच भास होईल, अशी एकंदरीत पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश कॅफेमध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. हीच आसन व्यवस्था महाविद्यालयीन व शाळकरी मुलांना आकर्षित करीत आहे. शाळकरी मुले आणि मुली या ठिकाणी वाढदिवस पार्टीच्या नावाखाली जात आहेत. पण एकांत मिळाल्यामुळे त्यांच्या हातून कळत भलतेच घडत आहे.
यापासून मुलांचे पालक मात्र अनभिज्ञ राहात आहेत. अशा प्रकारच्य कॅफेमधूनच भविष्यात घडणारे दुर्दैव संकेत मिळत आहेत. त्यामुळे पोलिसही यावर कारवाईसाठी पुढे येत आहेत. हे प्रकार टाळण्यासाठी अंधाऱ्या कोठडीतील कॅफे बंद करावेत, अशी मागण पालकवर्गातून होत आहे.
Love Birds Cafe Ravet | शाळा-महाविद्यालयाच्या वाटेवरच कॅफे
सर्वाधिक कॅफे हे शाळा-महाविद्यालयाच्या वाटेवरच आहेत. येता जाता मुला-मुलींना भेटण्यासाठी ही सुरक्षित जागा म्हणून पाहिली जात आहे. किती वेळ कॅफेमध्ये बसणार, यावर पैसे ठरविले जातात. शिवाय कोल्ड कॉफी व इतर पदार्थाची ऑर्डर केल्यामुळे यातून मिळणारे पैसे वेगळेच.
Love Birds Cafe Ravet | लव बर्ड्स कॉफी शॉपवर गुन्हा दाखल
बेकायदेशीरपणे कॉफी शॉप चालवून त्यामध्ये तरुण-तरुणींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्या प्रकरणी कॉफी शॉप मालक आणि चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 8) सायंकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास रावेत येथे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने केली.
कॅफे चालक धीरज प्रकाश मोहिते (वय 22, रा. वाकड), कॅफे मालक 34 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी महिला पोलीस अंमलदार संगीता जाधव यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी लव बर्ड्स कॅफे शॉपचा कोणताही परवाना नसताना लव बर्ड्स कॉफी शॉपचा बोर्ड लावला. त्यामध्ये खाद्यपदार्थ विक्री करण्याच्या सार्वजनिक ठिकाणी तरुण-तरुणींना बसण्यासाठी व अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारून कारवाई करत कॅफे चालक आणि मालकावर गुन्हा नोंदवला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.