पुणे महापालिकेला ‘जी-20’ ची लॉटरी

पुणे – शहरात झालेल्या “जी-20′ परिषदेची लॉटरी महापालिकेस लागली आहे. परिषदेच्या तयारीसाठी रस्ते सुशोभीकरण, रोषणाई, स्वच्छता, उड्डाणपूल-भुयारीमार्ग सुशोभीकरण अशी 166 कामे महापालिकेने निश्चित केली होती. या कामांसाठी तब्बल 200 कोटी रुपयांचा निधी नुकताच मिळाला आहे.
या आधीही शासनाने 60 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. मात्र, तो दि. 31 मार्च 2024 पर्यंत खर्च करण्याचे बंधन आहे. तो खर्ची न पडल्यास उर्वरित निधी परत करावा लागणार आहे. या परिषदेसाठी महापालिकेने 214 कोटी रुपये मागितले होते. महापालिकेने “जी-20′ परिषदेसाठी डिसेंबर 2022 पासून विकासकामे केली. तरी, प्रत्यक्षात नेमकी किती आणि कोणती कामे केली? याची एकत्रित माहितीच पालिकेकडे नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी प्रशासनाने पथ, घनकचरा, विद्युत, भवन, क्षेत्रीय कार्यालये तसेच इतर विभागांकडून प्रत्यक्ष केलेले काम आणि खर्चाची माहिती मागवली आहे.
“जी-20′ बैठकांसाठी उड्डाणपूल, भुयारी मार्गांची रंगरंगोटी, दुभाजकांमध्ये वृक्ष लागवड, झाडांची छाटणी, रस्ते सुशोभीकरण व दुरुस्तीसाठी, विद्युत व्यवस्था, राडारोडा उचलणे, भिंती रंगवणे, चौक रस्ते स्वच्छता, हेरिटेज वास्तूवर विद्युत रोषणाई इव्हेंट मॅनेजमेंट, हेरिटेज मार्गांचे सुशोभिकरण अशी कामे केलेली आहेत.
“या परिषदेसाठी महापालिकेने आधीच खर्च केलेला आहे. त्यानंतर आता “जी-20’च्या कामासाठी मिळालेला निधी मार्च 2024 पर्यंत वापरण्याची मुदत आहे. कोणत्या कामांवर किती खर्च झाला आहे, याचा आढावा येत्या आठवड्यात घेतला जाणार आहे. “- विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका





