कराड उत्तर व दक्षिण मतदारसंघासाठी भरघोस निधी

कराड -कराड उत्तर व कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मूलभूत सुविधांसाठी पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे नेहमीच मोठा निधी शासनाकडून मंजूर करीत आणत असतात. यावर्षीच्या अर्थसंकल्पातून मतदार संघातील रस्ते विकासासाठी ना. बाळासाहेब पाटील यांनी कराड उत्तर मतदार संघासाठी 48 कोटी 68 लाखांचा निधी आणला आहे. तर कराड दक्षिण मतदार संघासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी 27 कोटी 30 लाख इतका निधी मंजूर करुन आणला आहे. दोन्ही मतदारसंघातील विकासासाठी मोठा निधी मिळाला आहे.
सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील विविध रस्त्यांसाठी अर्थसंकल्प 2022 मधून 48.68 कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला असून, ही कामे लवकरच हाती घेण्यात येणार आहेत. सदरच्या कामांना निधी उपलब्ध करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अर्थसंकल्प 2022 मधून मंजूर झालेल्या कामांमध्ये खोडजाईवाडी-किवळ-मसुर-निगडी-घोलपवाडी-गायकवाडवाडी ते कराड तालुका हद्द रस्ता मध्ये किवळ गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे.
ता.कराड रू. 1.71 कोटी, खोडजाईवाडी-किवळ-मसुर-निगडी-घोलपवाडी-गायकवाडवाडी ते कराड तालुका हद्द रस्त्यांची सुधारणा करणे (भाग किवळ ते मसुर) ता.कराड रू. 2.85 कोटी, रा.मा.60 ते बनपुरी-अंबवडे-होळीचागाव-शेनवडी-चोराडे ते रा.मा.143 रस्ता पुनवडी ते चोराडे रस्त्यांची सुधारणा करणे, ता.खटाव रू. 2.37 कोटी, सासपडे निसराळे तारगांव-वाठार-आर्वी-नागझरी रस्ता प्रजिमा 35 कि.मी. मध्ये वाठार गावाजवळ लहान पुलाचे बांधकाम करणे. ता.कोरेगांव रू. 2.85 कोटी, यासह इतर गावांच्या विविध विकासकामांसाठी एकूण 48.68 कोटी रूपयांच्या कामांचा समावेश आहे.
तर कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील मूलभूत सुविधा सक्षम करण्याच्या दृष्टीने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे नेहमीच मोठा निधी शासनाकडून मंजूर करीत आणत असतात. यावर्षीच्या अर्थसंकल्पातून मतदार संघातील रस्ते विकासासाठी 27 कोटी 30 लाख इतका भरघोस निधी मंजूर झाला आहे. मतदारसंघातील रस्त्यांच्या विकासासाठी तसेच पुनर्बांधणीसाठी आ. चव्हाण बांधकाम मंत्र्यांकडे प्रयत्न करीत होते त्यांच्या या प्रयत्नाला यश आले असून मतदारसंघातील रस्ते विकासासाठी निधी मिळाला आहे.
या निधीतून पोतले ते विंग हॉटेल या रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणेसाठी 1 कोटी 80 लाख, रेठरे ते शेणोली स्टेशन या राज्य महामार्गावरील पंतोजी मळा येथे पुलाचे बांधकाम तसेच रस्त्याची उंची वाढविणेसाठी 2 कोटी 40 लाख, किरपे ते पोतले रस्त्याच्या विकासासाठी 1 कोटी 50 लाख, कोळे ते कराड तालुका हद्दीपर्यंत च्या रस्त्याचे नूतनीकरणासाठी 5 कोटी 90 लाख, विंग हॉटेल ते कोळे या रस्त्यांच्या बांधकामासाठी 4 कोटी 25 लाख, यासह इतर गावांच्या विविध विकासकामांसाठी निधी मतदारसंघातील या भागास मिळणार असून यामुळे दळण वळणासाठी मोठी सोय ग्रामस्थांना होणार आहे.





