पुणे जिल्हा | पावसामुळे बाजरी पिकाचे नुकसान; शेतकऱ्यांची तारांबळ

मोरगाव, (वार्ताहर) – बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात बाजरी काढलेल्या वेग आला आहे. मात्र, अचानक येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत आहे. पावसामुळे काढलेली बाजरी पीक भिजत असल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील मोरगाव, तरडोली, पळशी, मासाळवाडी, लोणी भापकर, माळवाडी, जळगाव कप, देऊळगाव रसाळ, आंबी बुद्रुक, आंबी खुर्द या पट्ट्यामध्ये खरीप हंगामातील बाजरीचे पिकं मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेले आहे.
पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांनी बाजरी काढणी व खुडणीस सुरुवात केली होती. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम ते मध्यम पावसाच्या सरीमुळे काढलेली बाजरी भिजत असल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे.
तसेच बाजरी काढणी व खुडणीला मजूर मिळत नसल्याने शेतकरी हातबल झाला आहे. महिलांसाठी साडेतीनशे रुपये रोज तर पुरुषांसाठी सहाशे ते सातशे रुपये रोज द्यावा लागत आहे.
यामुळे खरीपातील होणारे उत्पन्न व आलेल्या खर्च यांचे गणित जुळवण्यास शेतकरी मेताकुटीला आला आहे. तर पश्चिम भागातील अनेक शेतकरी पावसाच्या उघडपीची वाट पाहत आहे.





