वडगाव मावळ: अवकाळी पावसामुळे बाजरी पिकाचे नुकसान

वडगाव मावळ – मागील चार दिवसांपासून कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी बाजरीचे पीक धोक्यात आले आहे. दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसाने मावळ तालुक्याच्या पूर्व पट्ट्याला चांगलेच झोडपून काढले असून वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे काढणीस आलेले तयार बाजरीचे पीक शेतात आडवे झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
मावळ तालुक्यातील तळेगाव, इंदोरी, नाणोली, सोमाटणे, नवलाख उंबरे, आंबी, वराळे, गोळेवाडी, वारंगवाडी, वडगाव, कामशेत, शिरगाव, गहुंजे, बेबड ओहोळ, धामणे, गोडुंब्रे, साळुंब्रे, चांदखेड या पट्ट्यात असलेल्या गावांमध्ये अवकाळी पावसाने प्रचंड तडाका दिला. मंगळवारी तर सलग आठ ते दहा तास अवकाळी पाऊस झाला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले, सोबत शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले.
मावळ तालुक्यात ५०० हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी बाजरीचे पीक घेतले जाते. मावळात उन्हाळ्यात पाण्याची सोय असलेले शेतकरी बाजरीचे आणि भुईमुगाचे तसेच बागायती भाजीपाल्याची पिके घेतात. साधारणपणे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात बाजरी आणि भुईमूग पिकांची पेरणी होते. सध्या बाजरी काढण्याचा काळ असून शेतकरी पीक काढण्याची तयारी करीत आहे. अशात अचानक आलेल्या बिगरमोसमी पावसाचा फटका शेतातील उभ्या पिकाला बसला आहे. जोरदार वाऱ्यामुळे बाजरीचे उभे पीक शेतात आडवे झाले असून तयार बाजरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
रानमेवा धोक्यात –
शेतातील पिकासोबत जंगल भागातील रानमेवा देखील अवकाळीच्या तडाख्यात सापडला आहे. एकीकडे सततच्या पावसाने रानमेवा बेचव होत असताना दुसरीकडे वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसाने आंबा, जांभूळ अशा फळांची पडझड होत आहे. यामुळे लवकरच बाजारात ह्या फळांची कमतरता निर्माण होऊन दर वधारण्याची शक्यता आहे. आंबे पडल्याने आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.





