satara | पूल बांधकाम, जलवाहिनी शिफ्टिंगमुळे नागरिकांची दैना

सातारा, (प्रतिनिधी) – शाहूपुरी ते दिव्यनगरी रस्त्यावर जुन्या सन डॉन हॉटेलजवळ सुरु असलेल्या पुलाचे बांधकाम व जलवाहिनी शिफ्टींगच्या कामामुळे करण्यात आलेला पर्यायी रस्ता धोकादायक बनला आहे. पावसामुळे या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली असून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पूल बांधकाम, जलवाहिनी शिफ्टींग व पर्यायी रस्ता यामुळे नागरिकांची अशक्षश: दैना उडाली आहे. या ठिकाणचा धोकादायक ठरु पाहणारा पर्यायी रस्ता बंद करुन अन्य पर्यायी रस्ता प्रशासनाने करुन द्यावा, अशी मागणी शाहूपुरी येथील भारत भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी शाहूपुरी ते दिव्यनगरी रस्त्यावर जुन्या सन डॉन हॉटेलजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाचे काम सुरु करण्यात आले होते. या कामादरम्यान कण्हेर पाणी योजनेच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागून शाहूपुरीतील पाणी पुरवठा विस्कळित झाला होता. त्यानंतर जलवाहिनी दुरुस्ती झाली मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वादात हे काम रेंगाळले होते.
याबाबत भारत भोसले यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून जलवाहिनी शिफ्टींगचे काम यु्ध्दपातळीवर सुरु आहे. या कामांंमुळे याठिकाणी करण्यात आलेल्या पर्यायी रस्त्यावर वाहनांची गर्दी वाढली आहे. हा पर्यायी मार्ग कच्चा असल्याने आणि याठिकाणी ओढा असल्याने दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे हा रस्ता धोकादायक बनला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठून याठिकाणी चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या रस्त्यावर लहान, मोठी वाहने घसरुन अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
पुलाच्या बांधकामासाठी लगतच्या शेतजमिनीतून पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र सद्यस्थितीत हा रस्ताओढ्यातून काढला गेल्याने अवकाळी पावसामुळे येथील पाण्याचा प्रवाह जास्त प्रमाणात प्रवाहित असतो. या रस्त्यावरील चिखलामुळे नागरिकांना वाहन चालविणे धोकादायक बनले आहे.
या सर्व बाबी विचारात घेता भविष्यातील एखादी दुर्दैवी घटना टाळण्यासाठी हा पर्यायी रस्ता बंद करून आदर्श कॉलनी-चैतन्य कॉलनी-गजानन कॉलनी-जयभवानी कॉलनी मार्गे शाहूपुरी चौक, असा डांबरी रस्ता पर्यायी रस्ता म्हणून वापरण्याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही करावी, अशी मागणी भारत भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे केली आहे. याबाबत सकारात्मक मार्ग काढला जाइल अशी ग्वाही कार्यकारी अभियंत्यांकडून देण्यात आली आहे.
शाहूपुरी ते दिव्यनगरी रस्त्यावर सुरु असलेले पुलाचे बांधकाम गतीने होणे अपेक्षित आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जलवाहिनी शिफ्टींग कामामुळे पाणी पुरवठा विस्कळित आहे. पर्यायी रस्ता व्यवस्थित नसल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. अशा संकटात प्रशासनाने जनभावना ओळखून हे काम गतीने पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा. – भारत भोसले , शाहूपुरी





