लॉस एंजेलिसमधील जंगलातील आग नियंत्रणाबाहेर, एक हजार घरे उद्ध्वस्त, आणीबाणी जाहीर

Los Angeles Wildfire | अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलिस परिसरात मंगळवारी (७ जानेवारी) आग लागल्याची घटना घडली आहे. जोरदार वाऱ्यांमुळे या आगीने रुद्ररूप धारण केले. ताशी 97 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली, ज्यामुळे 5 लोकांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. या अपघातात एक हजाराहून अधिक घरे उद्ध्वस्त झाली असून हजारो लोकांना सुरक्षित स्थळी जावे लागले आहे.
या आगीनंतर आजूबाजूला धुराचे ढग दिसत आहेत. लॉस एंजेलिस परिसरातील आगीमुळे, अधिकाऱ्यांनी लाखो लोकांना शक्य तितक्या लवकर त्यांची घरे रिकामी करण्यास सांगितले आहे. मंगळवारी संध्याकाळी, लॉस एंजेलिसच्या ईशान्येकडील नैसर्गिक राखीव क्षेत्राजवळ लागलेल्या आगीने 2,000 एकरहून अधिक क्षेत्र व्यापले. ही आग नागरी भागापर्यंत पोहचली आहे.
आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण
या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आग विझवण्याऐवजी वेगाने पसरत आहे. जोरदार वाऱ्यामुळे आग आणखी भडकली आहे, त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. बुधवारी (8 जानेवारी) वाऱ्याचा वेग ताशी 129 किलोमीटरवर पोहोचल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले होते.
पॅसिफिक पॅलिसेड्स, ईटन आणि हर्स्टमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. हेलिकॉप्टरमधून पाणी फवारले जात आहे. पॅलिसेड्समध्ये १५,००० एकर, ईटनमध्ये १०,००० एकर आणि हर्स्टमध्ये ५०० एकरपेक्षा जास्त जमीन आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहे. Los Angeles Wildfire |
हॉलिवूड स्टार्सना घर सोडावे लागली
आगीमुळे जेमी ली कर्टिस, मार्क हॅमिल, मँडी मूर आणि जेम्स वुड्स या हॉलिवूड स्टार्सना घर सोडावे लागले. अनेक घरांना आगीने वेढले आहे. घरातून निघताना अनेकांनी आपल्या गाड्याही रस्त्यांवरच सोडून दिल्या आहेत. यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या, अँबुलन्स, पोलिसांच्या गाड्यांना वाट करून देण्यासाठी बुलडोझरने या वाहनांना बाजुला केले जात आहे. अनेक घरांना वाचविण्यासाठी लोकांनी आजुबाजुची झुडुपे कापून टाकली आहेत. Los Angeles Wildfire |
राज्यपालांकडून आणीबाणीची घोषणा
राज्यपाल गेविन न्यूजम यांनी घटनास्थळी भेट देत आणीबाणी घोषित केली आहे. येथील 70,000 रहिवाशांना स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यातील जखमींमध्ये अशा लोकांचा समावेश आहे ज्यांनी स्थलांतराच्या आदेशाकडे दुर्लक्ष केले. आगीमुळे परिस्थिती बिघडलेली पाहून मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी इटलीचा दौरा रद्द केला आहे. Los Angeles Wildfire |
अग्निशमन दलाची आव्हाने
लॉस एंजेलिस अग्निशमन दलाला त्यांच्या ऑफ-ड्युटी कर्मचाऱ्यांना मदतीसाठी बोलवावे लागले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अग्निशमन विमानांना टेक ऑफ करण्यात अडचणी येत आहेत.
हेही वाचा:





