पुणे | महा ई सेवा केंद्राकडून विद्यार्थ्यांची लूट

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – दहावी-बारावीचा निकाल लागला असून, पुढील प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे दाखले आवश्यक असतात. हे दाखले काढण्यासाठी महा ई सेवा केंद्रांमध्ये गर्दी होत आहे. मात्र, काही महा ई सेवा केंद्रांतून दाखल्यांसाठी जादा पैसे आकारल्याच्या तक्रारी येत आहे.
विविध प्रकारच्या दाखल्यांचे दर हे साधारणपणे 33 रुपये ते 60 रुपयांच्या दरम्यान असताना महा ई सेवा केंद्र चालक तब्बल एक हजार ते दीड हजार रुपये नागरिकांकडून उकळत असल्याचे समोर आले आहे.
दाखल्यांसाठी सेतू केंद्रात गर्दी होऊ नये, कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नयेत, घराजवळील केंद्रातून नागरिकांना ऑनलाइन दाखले मिळावे, यासाठी विविध प्रकारचे दाखले देण्याची सुविधा महा ई सेवा केंद्रामार्फत राबविण्यात येते.
मात्र, आता काही महा ई सेवा केंद्रांतून दाखल्यांसाठी जादा पैसे आकारल्याच्या तक्रारी येत आहेत. उत्पन्न दाखल्यासाठी 33 रुपये 60 पैसे आकारणे आवश्यक असताना नागरिकांकडून तब्बल एक ते दीड हजार रुपये वसूल करण्यात येत आहेत.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध प्रकारचे दाखले आवश्यक असतात. तसेच शाळा, महाविद्यालयांत प्रवेश, आरटीई प्रवेश, शहरी गरीब योजना, म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करणे आदी कारणांसाठी उत्पन्न दाखला, रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे महा ई सेवा केंद्रात दाखले घेण्यासाठी नागरिक अर्ज करतात. डिजिटल स्वाक्षरीत ऑनलाइन पद्धतीने हे दाखले महा ई सेवा केद्रांतून नागरिकांना मिळतात.
कारवाईनंतरही जैसे थे
नागरिकांची गरज ओळखून महा ई सेवा केंद्रचालक जादा पैसे आकारतात. प्रत्यक्षात मात्र दाखल्यांसाठीची फी ही अत्यंत कमी असते. जिल्हा प्रशासनाकडे याबाबतच्या तक्रारी झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही महा ई सेवा केंद्रांवर कारवाई करून ती केंद्रे बंद करण्यात आली आहेत,
तसेच जे केंद्रचालक अथवा कर्मचारी दरपत्रकापेक्षा जादा रकम आकारतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. मात्र, याचा महा ई सेवा केंद्रांवर काहीही फरक पडल्याचे दिसत नाही.
दरपत्रकाच्या आदेशाला केराची टोपली
जिल्हा प्रशासनाने महा ई सेवा केंद्रात दाखल्यांसाठीचे असलेले दरपत्रक लावण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या नियमांचे पालन होताना दिसत नाही. केंद्रचालकांकडून जिल्हा प्रशासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे दिसत आहे.




