पुणे जिल्हा | वाढत्या तापमानामुळे लोणीकर घायाळ

लोणी काळभोर, (वार्ताहर)- गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे लोणी काळभोरसह पूर्व हवेलीतील नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून कमीत कमी एक महिना लागणार आहे. सतत थंड पाणी, शीतपेय पिणे, झाडाखाली, सावलीत बसणे किंवा पंख्याची हवा घेणे या गोष्टींना नागरिक प्राधान्य देत आहेत.
लोणी काळभोरसह पूर्व हवेलीचा भाग हा परिसरातून वाहणा-या नवा व जुना मुठा कालवा तसेच मुळा मुठा नदी यामुळे बारमाही बागायती शेती असलेला भाग आहे. त्यामुळे या ठिकाणी तापमान तुलनेत कमी असते. परंतु यंदा मात्र तापमानाचा पारा दररोजच थोडा थोडा वाढत आहे. त्यामुळे शेतकरी, पुरुष व महिला शेतमजूर, दुकानदार, नोकरदार सर्वच जण यंदाचा उन्हाळा कडक आहे, असे म्हणत आहेत. शाळकरी मुले वेगवेगळ्या विहीरींमध्ये तसेच कॅनलमध्ये दररोज दुपारी पोहत आहेत.
कडक उन्हाळ्यामुळे पंखे, कूलर, एसी, फ्रिज, माठ यांची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. त्यातच वेगवेगळ्या कारणांमुळे महावितरण कंपनीचा वीजपुरवठा गेल्या काही दिवसांत वारंवार खंडित होत आहे. वीज पुरवठा बंद झाल्यावर पंखे बंद होत असल्याने नागरिक चिडचिड करत आहेत. उन्हाळ्यामुळे पिकांना वरचेवर पाणी द्यावे लागते. परंतु विहीरींच्या पाण्याची पातळी खालावत चालली आहे.
नवा मुठा उजव्या कालव्याचे पाणी बंद होण्याची शक्यता असल्याने शेतक-यांची पळापळ सुरु झाली आहे. सध्या नवीन मुठा उजव्या कालव्याचे पाणी बंद झाले आहे. जुन्या कालव्यातून दूषित पाणी पुरवठा सुरू आहे. पुणे महानगर पालिका व जलसंपदा विभागाने जुन्या कालव्यातील पाणी पुरवठा सतत चालू रहावा याकडे लक्ष देण्याची गरज शेतकरी व्यक्त करत आहेत.





