Pune Crime : लोणीकंदमध्ये पाण्याच्या टाकीजवळ आढळला सुरक्षारक्षकाचा मृतदेह

पुणे – लोेणीकंदमधील महाराष्ट्र बँकेच्या बाजूला असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ शनिवारी सायंकाळी एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेह आढळून आलेली व्यक्ती डाव्या हाताने दिव्यांग असून सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होती. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
संतोष पवार (४६, रा. वडगाव शेरी) असे मृतदेह आढळून आलेल्याचे नाव आहे. शनिवारी सायंकाळच्या सुमारास बँक ऑफ महाराष्ट्र शेजारील पाण्याच्या टाकीजवळ मृतदेह असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली होती.
माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मृतदेहाच्या खिशातील पकिटामध्ये असलेल्या कागदपत्रांच्या आधारे त्याचे नाव संतोष पवार असल्याचे समोर आले. त्यावरून पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क केला. दरम्यान, पवार यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत तपास सुरू आहे, अशी माहिती लोणीकंद पोलिसांकडून देण्यात आली.




