Pune Gramin News : लोणीकंद पोलिसांनी फायरिंगच्या गुन्ह्यातील आरोपींना 12 तासात केले जेरबंद

वाघोली: लोणीकंद येथे १३ मार्च रोजी रात्रीच्या वेळी पत्नीचे अनैतिक फोटो मागणीच्या कारणावरून मारहाणीची घटना घडली होती. तसेच या मारहाणीच्या घटनेत वाद मिटविण्यासाठी गेलेल्या फिर्यादी व साक्षीदार यांना बोलवून घेऊन हवेत अग्निशस्त्रातून दोन राऊंड फायर करण्यात आले होते. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. तसेच फिर्यादी व साक्षीदार यांना लाकडी दांडक्याने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. अखेर लोणीकंद पोलिसांनी या घटनेतील आरोपींना १२ तासांत जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओंकार अंकुश लांडगे( वय 25 वर्षे रा. वाढेगाव, ता. हवेली, जि पुणे), गणेश संजय चौधरी, (वय 29 वर्षे, रा. वाढेगाव, ता. हवेली, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनाही पोलिसांनी वाढेगाव येथून अटक केली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्यात आरोपींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे हे करत आहेत.





