Loni Kalbhor | फोनवर बोलणं ठरलं जीवघेणं, रेल्वे धडकेत ३० वर्षीय तरुण जागीच ठार

प्रभात वृत्तसेवा
लोणी काळभोर – कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत फोनवर बोलत चालत जाताना रेल्वेने धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात पुणे सोलापूर लोहमार्गावर थेऊर रेल्वे उड्डाणपुलाखाली गुरुवारी (दि. 7) सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास घडला.बंटी राजा परमार (वय 30, मूळ रा. पिप्रोदा उबारी, मध्यप्रदेश राज्य) असे या यवकाचे नाव आहे. बंटी परमार हा लोणी काळभोर परिसरात कामाच्या शोधात आला होता.
त्याला कामही मिळाले होते. बंटी परमार हा फोनवरून बोलत पायी चालला होता. थेऊर रेल्वे उड्डाणपुलाखालून तो जात असताना त्याला रेल्वेने जोरदार धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल वैभव खोत व प्रसाद ताम्हाणे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या बंटी परमार याला रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र बंटी परमार याचा उपचारापूर्वीच मूत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.





