पुणे : दोघेही सज्ञान आहे. ३ वर्षांहून अधिक काळ दोघांचे शारीरिक संबंध आहेत. संबंधाच्या कालावधीची ही दिर्घकालीन व्याप्ती पाहता लग्नाच्या अमिषाने अत्याचार केल्याचे दिसून येत नाही, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने तरूणाला अत्याचाराच्या गुन्ह्यातून दोषमुक्त केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. आर. चौधरी यांनी हा आदेश दिला. या निर्णयामुळे तरूणाला दिलासा मिळाला आहे. तुषार मनोहर बिडे याने लैंगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यात दोषमुक्त करण्यासाठी ॲड. सुचित मुंदडा व ॲड. साक्षी पैलवान यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला होता. तरूण-तरूणीचे २०१३ पासून प्रेमसंबंध होते. काही काळ लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये होते. मात्र, २०१६ मध्ये लग्नाचे अमिष दाखवून संबंध ठेवले म्हणून तिने वाकड पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार लैंगिंक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्रही दाखल केले. त्यानंतर त्याने दोषमुक्त करण्याठी न्यायालयात अर्ज केला होता. त्यावेळी ॲड. सुचित मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. साक्षी पैलवान यांनी युक्तीवाद केला की, लग्नाचे अमिष दाखवून ठेवलेले संबंध हे आकस्मिक असतात. मात्र, दोन सज्ञान व्यक्तीम्ध्ये दीर्घकाळ झालेले संबंध लैंगिंक अत्याचार ठरत नाहीत. त्याने लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिंक अत्याचार केल्याचा दोषारोपपत्रामध्ये एकही पुरावा नाही. तसेच, याबाबतचा सर्वौच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्याचे दाखले दिले. तरूणाला गुन्ह्यातून वगळण्याची मागणी केली. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने तरूणाला दोषमुक्त केले.