Lonavala News : लोणावळ्यात मनसेचे शक्तिप्रदर्शन ; शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षात जाहीर प्रवेश

प्रभात वृत्तसेवा
लोणावळा – पर्यटननगरी लोणावळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षबांधणी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. शहरात पक्षाला मोठ्या प्रमाणात पाठबळ वाढत आहे. मावळ तालुका आणि लोणावळा शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत जाहीर प्रवेश करत शहरातील पक्षाची ताकद लक्षणीय पद्धतीने वाढवली आहे.या पक्षप्रवेश सोहळ्याला मनसेचे सरचिटणीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन मनसे मावळ तालुका अध्यक्ष अशोक कुटे आणि लोणावळा शहराध्यक्ष निखिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
सोहळ्यात मनसेच्या संघटनात्मक बांधणीत बदल झाला, नवीन तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष नियुक्त झाले, तरी पक्षाचे काम जसे चालू होते तसेच सुरू राहिले. मराठी भाषेचा संवर्धन, कामगारांचे हक्क, थकीत पगाराचे प्रश्न मार्गी लावणे आणि नागरिकांच्या स्थानिक अडचणी सोडवणे या विषयांवर मनसेने सातत्याने काम करत सकारात्मक छाप निर्माण केली आहे. या पक्षप्रवेशामुळे मनसेची ताकद दुप्पट झाली असून, संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली आहे. नवीन कार्यकर्त्यांमध्ये नव्या आत्मविश्वासाचा संचार झाला असून, आगामी निवडणुकीत मनसे विरोधकांना गंभीर आव्हान देण्याची शक्यता आहे.




