Lonavala | पावसाचं लोणावळ्यात थैमान! १७ इंच पाऊस, घाटात रेड अलर्ट

प्रभात वृत्तसेवा
लोणावळा – लोणावळा शहर आणि परिसरात पावसाने थैमान घातले असून, गेल्या २४ तासांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी सकाळी ७ ते बुधवारी सकाळी ७ वाजेपर्यंत शहरात तब्बल ४३२ मिलिमीटर (१७.०१ इंच) पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी देखील दिवसभर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या, त्यामुळे जनजीवन काहीसे विस्कळीत झाले.
संततधार पावसामुळे लोणावळ्यातील अनेक धरणे पूर्ण भरली आहेत. रेल्वेचे भुशी धरण १०० टक्के भरले असून, त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय, टाटा कंपनीच्या वलवण आणि लोणावळा धरणात तसेच नगरपरिषदेच्या तुंगार्ली धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचले आहे. लोणावळा-औंढे रस्ता, नारायणी धाम-कैवल्यधाम रस्ता आणि वलवण-बापूजी बुवा मंदिर रस्ता पाण्याखाली गेला आहे.
यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती तर अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे.
पुढील दोन दिवस घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. लोणावळा नगरपरिषदेने शहरातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी बुधवार आणि गुरुवार असे दोन दिवस सर्व शाळांना स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी आणि पर्यटकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.





