Lonavala Accident : लोनवळ्याची ट्रीप बेतली जीवावर! ओव्हरटेक करताना कार पलटी; ३ तरुणांचा जागीच मृत्यू
Lonavala Accident : लोणावळ्याला सूर्योदय पाहून परतताना पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत भीषण अपघात; आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यासह तिघांचा करुण अंत.
Updated On:

Lonavala Accident – पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी (दि. १८) झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगातील चारचाकी उलटल्याने हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, तीन चारचाकी मुंबईच्या दिशेने एकामागोमाग जात असताना एका कारने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी वेगावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये आयआयटी मुंबई (पवई) येथील एका विद्यार्थ्याचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. मृतांची नावे ओमकुमार बोरसे (वय २३), दशरथ भारत (वय २२) आणि श्रेयांश शर्मा अशी आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणांनी मुंबईत चित्रपट पाहिल्यानंतर लोणावळा येथे सूर्योदयाचा आनंद घेत पुन्हा मुंबईकडे परतत असताना हा अपघात झाला. दरम्यान, वाहनांमध्ये रेसिंग सुरू असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.


