लोणंद: श्रीमंतांचा छंद ठरतोय गरीबांसाठी जीवघेणा; बैलागाडा शर्यतीतील जखमीचा मृत्यू

लोणंद – लोणंद येथील बैलगाडा शर्यतीत अपघात होऊन गंभीर जखमी झालेल्या बैलगाडा चालकाचे पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. बोरखळ येथील शर्यतीदरम्यान झालेल्या अपघाती मृत्यूनंतर आता लोणंद येथील शर्यतीत झालेल्या मृत्यूमुळे गावोगावी होत असलेल्या बैलगाडा शर्यतींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
लोणंद येथे (दि. १०) फेब्रुवारी रोजी ‘केसरी भव्य बैलगाडा शर्यतींचे आयोजन लोणंद निंबोडी रोडवर गोटेमाळ याठिकाणी करण्यात आले होते. या बैलगाडा शर्यतीत सुमारे दोनशे बैलगाड्यांनी सहभाग घेतला होता. या शर्यती दरम्यान (दि. १०) रोजी दुपारच्या सुमारास बैलगाडी चालक अरुण विठोबा जाधव (वय ५०, रा. कोरेगाव, ता. फलटण (मूळ गाव देऊर) हे बैलगाडीवरून पडल्याने मागे घसरत जाऊन त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागला.
या अपघातात त्यांच्या शरीराची एक बाजू पूर्णपणे जमिनीला घासत गेल्याने अरुण जाधव गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर त्यांना पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास त्यांचा पुणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या अपघाताची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात झाली नसल्याचे सांगण्यात आले असून याप्रकरणात पोलीसांकडून ठोस पाऊल उचलण्यात येऊन आयोजकांवर गुन्हे दाखल होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
श्रीमंतांचा छंद ठरतोय गरीबांसाठी जीवघेणा –
बैलगाडा चालक अरुण जाधव वाठार स्टेशनजवळील देऊर या गावचे मूळ रहिवासी होते. ते लोणंदजवळील कोरेगाव याठिकाणी आपली पत्नी मनीषा आणि दोन मुलं गौरी (१७) आणि प्रशांत (१२) यांच्यासह राहत होते. त्यांची परिस्थिती अतिशय बेताची असून त्यांची पत्नी मोलमजुरीची कामे करते. कुटुंबासाठी अधिक पैसे मिळतील या आशेने अरुण जाधव इतरांच्या बैलगाड्यावर शर्यतीत चालक म्हणून काम करायचे.
अनेक मोठमोठे बागायतदार, राजकीय व्यक्ती शौक म्हणून बैलगाडा शर्यतीसाठी बैल सांभाळून असतात. शर्यतीत मिळणाऱ्या पैशांपेक्षा शर्यत जिंकणे हे त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचे असते. त्यासाठी पैशांसाठी आपल्या जीवावर उदार होऊन बैलगाडा चालवणारांना गाडा मालक चांगल्या पैशाचे आमिष दाखवून आपलाच गाडा चालवावा यासाठी प्रयत्न करत असतात. अरूण जाधव यांचा मृत्यू झाल्याने श्रीमंतांच्या या खेळात किती गरीब आपल्या प्राणांची बाजी लावून असेच मरत राहणार हा यक्षप्रश्न आहे.





