Lonand Crime: चोरीचे सत्र कधी थांबणार? रावडी खुर्दमध्ये २ लाखांची ट्रॉली लंपास; नागरिक संतप्त
Lonand Crime: ग्रामीण भागात शेतीची अवजारे आणि वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर; चोरीच्या वाढत्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण.

Lonand Crime – लोणंद पोलीस ठाणे हद्दीत चोर्यांचे सत्र सुरूच असून रावडी खुर्द गावच्या हद्दीत सावता दादासो शिंदे यांच्या गुर्हाळाशेजारी, मारुती चौगुले यांच्या घराजवळ उभी केलेली तब्बल दोन लाख रुपये किमतीची ट्रॉली अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी लोणंद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावडी खुर्द येथील शेतकरी दिलीप बजरंग मोटे यांची लाल रंगाची ट्रॉली (क्र. एमएच 11 डीएच 0395) दि. 2 जुलै रोजी सायंकाळी सात ते दि. 3 जुलै रोजी सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान रावडी खुर्द गावच्या हद्दीत उभी होती. या कालावधीत अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.
ट्रॉलीची अंदाजे किंमत दोन लाख रुपये आहे. चोरी झाल्यानंतर दिलीप मोटे यांनी संभाव्य ठिकाणी शोध घेतला. मात्र ट्रॉलीचा ठावठिकाणा न लागल्याने अखेर दि. 5 ऑगस्ट रोजी रात्री लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. अज्ञात चोरट्याचा शोध सुरू आहे. पोलीस नाईक मदने हे तपास करीत आहेत.
चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता
लोणंद पोलीस ठाणे हद्दीत यापूर्वीही विविध ठिकाणी चोरीच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर आता रावडी खुर्द येथील ट्रॉली चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. ग्रामीण भागात शेतमाल, शेतीची अवजारे, वाहने व इतर साहित्य सुरक्षित ठेवण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, चोरीच्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त अधिक प्रभावी करण्याची मागणी होत आहे. लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील चोरीचे सत्र कधी थांबणार? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.





