श्री गुरुदेवदत्त विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

सविंदणे : सविंदणे ता. शिरूर येथील श्री गुरुदेवदत्त विद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख योगेश दुसाने व सुलक्षणा दुसाने यांनी विद्यालयाच्या नव्याने रुजू झालेल्या प्राचार्य शारदा मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता आठवी अ च्या विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सविंदणे विद्यालयात नव्याने रुजू झालेल्या पहिल्या महिला मुख्याध्यापिका शारदा मिसाळ मॅडम होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलक्षणा दुसाने व आर्या पडवळ यांनी केले. ग्रामस्थांच्या वतीने विद्यालयांमध्ये 14 वर्ष उपशिक्षिका पदावर काम केलेल्या व एक ऑगस्ट पासून सविंदणे येथे मुख्याध्यापक पदावर रुजू झालेल्या मुख्याध्यापिका शारदा मिसाळ यांचा माजी विद्यार्थी कैलास पडवळ गुरुजी, दत्तात्रय पडवळ, अर्जुन लंघे तसेच ग्रामस्थ व विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्यार्थी भाषणामध्ये विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगितले.
शिक्षक भाषणात भरत थोरात सर यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवनातील विविध जोखमीचे प्रसंग व अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी निर्भीडपणा, अभ्यासवृत्ती, आज्ञाधारकपणा या सवयी आत्मसात केल्या पाहिजेत असे सांगितले. अध्यक्षीय भाषणामध्ये शारदा मिसाळ मॅडम यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेचे संस्थापक बाबुरावजी घोलप साहेब, लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला वंदन करून आपल्या उपशिक्षिका पदाच्या नोकरीची सुरुवात ते आज प्राचार्य म्हणून या विद्यालयांमध्ये रुजू होतानाचा अनुभव सांगितला.
विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे,घोलप साहेब यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपले जीवन यशस्वी बनवले पाहिजे. यासाठी विद्यालयातील ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या जास्तीत जास्त पुस्तकांचे वाचन करावे. आपल्या जीवनामध्ये शिस्त, स्वच्छता याला अधिक महत्त्व आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले. आभार विराज शिंदे याने मानले.





