कर्नाटकात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर लोकायुक्तांचे छापे; रोकड, सोने….

बेंगळुरू – कर्नाटकातील लोकायुक्तांनी सोमवारी 17 सरकारी अधिकाऱ्यांच्या 70 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकले, ज्यांवर त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे.
या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड, सोने, स्थावर मालमत्ता, आलिशान वाहने, जमिनीतील गुंतवणूक, अन्य किंमती वस्तुंचा साठा आणि महागडे गॅजेट्स सापडले आहेत. लोकायुक्त पोलिसांच्या अनेक पथकांनी न्यायाधिकारी पोलिसांच्या सहाय्याने पहाटेच्या सुमाराला हे छापे टाकले.
पोलिस महानिरीक्षक (लोकायुक्त) डॉ ए सुब्रमण्यहवरा यांनी पीटीआयला सांगितले की “आम्ही संपूर्ण कर्नाटकात सरकारी अधिकाऱ्यांच्या विरोधात 17 गुन्हे दाखल केले आहेत. हे छापे 70 ठिकाणी सुरू आहेत”.
लोकायुक्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बेंगळुरू, मंड्या, रायचूर, बिदर, कलबुर्गी, चित्रदुर्ग, बल्लारी, तुमकुरू, उडुपी, हसन, बेलगावी, दावणगेरे आणि हावेरी जिल्ह्यात हे छापे टाकण्यात आले.यातून जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेची मोजदाद सुरू आहे. त्याचा तपशील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.





