Lok Sabha Elections 2024 : राहुल गांधी विरोधकांचे अनभिषिक्त नेते! BJP च्या नजरेत थेट पंतप्रधानपदाचे उमेदवार

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकजूट करण्याचे मन विरोधकांनी बनवले आहे. पाटण्यात नुकत्याच झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत संभाव्य ऐक्याविषयी सहमती झाली. एकत्र येण्यासाठी अडचणीचा ठरू शकणारा नेतृत्वाचा मुद्दाही विरोधकांनी बॅकसीटवर ठेवला. तसे असले तरी, कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे विरोधकांचे अनभिषिक्त नेतेपद गेल्याचे मानण्यास पुरेसा वाव आहे. केवळ विरोधकच नव्हे; तर सत्ताधारी भाजपही आता राहुल यांच्याकडे महत्वाचा नेता म्हणून पाहू लागल्याचे दिसते. एवढेच काय, भाजपच्या नजरेत विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून राहुलच असल्याचे सूचित होत आहे.
राहुल यांच्या नेतृत्वाचा विषय पुढे येण्याचे कारण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वक्तव्ये. खरेतर टीका अन् त्यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाने (जेडीयू) काढलेला निष्कर्ष. शहा यांच्या नुकत्याच बिहार आणि राजस्थानमध्ये सभा झाल्या. राहुल यांना नेता म्हणून लॉंच करण्याचा अयशस्वी प्रयत्न कॉंग्रेस मागील 20 वर्षांपासूून करत आहे, अशी खिल्ली शहांनी बिहारच्या सभेत उडवली. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल यांच्यापैकी कोण याची निवड जनता पुढील लोकसभा निवडणुकीत करेल, असे भाष्यही त्यांनी केले. त्याचा आधार घेऊन जेडीयूने राहुल यांच्याविषयी महत्वपूर्ण दावा केला. भाजप कालपर्यंत राहुल यांना नेता मानण्यास तयार नव्हता. मात्र, त्यांना आता शहांनीच नेता म्हणून मान्यता दिली आहे, असे जेडीयूने म्हटले.
बिहारनंतर राजस्थानमधील सभेत बोलताना शहा यांनी आणखी पुढचे वक्तव्य केले. त्यांनी मोदी आणि राहुल यांची तुलना केली. राहुल पंतप्रधान बनल्यास देशाच्या नशिबी भ्रष्टाचार, घोटाळे येतील. त्याउलट, मोदींची फेरनिवड झाल्यास घोटाळेबाज तुरूंगात जातील, असे शहांनी म्हटले.
खरेतर, भाजपने याआधी नेहमीच असमर्थ, अपरिपक्व, गांभीर्य नसलेला नेता अशी राहुल यांची प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न केला. पण, आता राहुल यांच्याकडे पाहण्याचा भाजपचा दृष्टीकोन बदलू लागल्याचे म्हणता येईल. विरोधकांच्या गोटात पंतप्रधानपदाची आकांक्षा बाळगणारे अनेक नेते आहेत. ते हेरून विरोधकांच्या संभाव्य ऐक्याला सुरूंग लावण्याच्या उद्देशातून जाणीवपूर्वक राहुल यांचे नाव पुढे करण्याची खेळीही भाजपची असू शकते. पण, तो पक्ष नकळत राहुल यांना विरोधकांचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करत आहे. त्यातून राहुल आता प्रस्थापित नेते बनल्याचे मानता येईल. अर्थात, त्याची इतरही कारणे आहेत.
बहुतांश कॉंग्रेसजनांची राहुल यांनी पुन्हा पक्षाचे अध्यक्ष बनावे अशी इच्छा होती. मात्र, राहुल नकारावर ठाम राहिले. त्यामुळे कॉंग्रेस अध्यक्षपद गांधी परिवाराबाहेर गेले तरी राहुल हेच पक्षाचे क्रमांक एकचे नेते असल्याचे कुणीही मान्य करेल. पक्षाध्यक्षपद नाकारून त्यांनी भारत जोडो यात्रेवर संपूर्ण फोकस केला. त्या यात्रेचे फळही त्यांना मिळाले. त्यांची प्रतिमा उजळून निघाली. त्याशिवाय, कॉंग्रेसमध्येही नवचैतन्य निर्माण झाले. यात्रेला देशभरातील जनतेचा लक्षणीय प्रतिसाद लाभल्याने इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांचाही राहुल यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणखी सकारात्मक बनला. त्याचे प्रत्यंतर पाटण्यातील विरोधी पक्षांच्या बैठकीतूनही आले. त्या बैठकीसाठी आधीची तारीख ठरवण्यात आली होती. मात्र, राहुल परदेश दौऱ्यावर असल्याने बैठक काही दिवसांनी घेण्यात आली.
मागील काही काळात राहुल यांनी स्वत:च्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल केल्याचे दिसते. केवळ सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यात धन्यता न मानता थेट जनतेशी संवाद साधण्याचे कौशल्य त्यांनी आत्मसात केले आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून ते अनेक राज्यांमधील जनतेपर्यंत पोहचले. त्यानंतरही कधी ट्रकचालक, विद्यार्थी, गॅरेजवाले अशा विविध घटकांमध्ये मिसळताना ते दिसत आहेत. मणिपूर हिंसाचाराविषयी नुकतीच केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. त्या बैठकीत विरोधी पक्षांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ मणिपूरला पाठवण्याचा प्रस्ताव मांडला. तो मंजूर होण्याची प्रतीक्षा करण्याच्या फंदात न पडता राहुल थेट मणिपूर दौरा करूनही आले. त्यातून थेट जनतेत जाणारा, जनतेच्या प्रश्नांना भिडणारा नेता अशी त्यांची प्रतिमा बनू लागली आहे.
मणिपूर दौऱ्यात राहुल यांचा ताफा पोलिसांनी रोखला. त्यावरून तृणमूल कॉंग्रेस, आप या पक्षांनीही भाजपवर टीकास्त्र सोडले. त्यावरून विरोधक राहुल यांच्या पाठिशी उभे राहू लागल्याचे स्पष्ट होत आहे.
मिश्कील लालूंनी दिला मेसेज?
पाटण्यातील बैठकीत विरोधी पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले. त्या बैठकीत राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या मिश्कील शैलीत राहुल यांच्याविषयी खास टिप्पणी केली. हमारी बात मानिए. शादी करिए. हम लोग बारात में चलेंगे, असे लालूंनी म्हटले. त्यातून लालूंनी राहुल विरोधकांचे नेते बनू शकतात, असा मेसेज दिल्याची चर्चा तेव्हापासूनच रंगली आहे.





